विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून सत्तास्थापनेसाठी व मुख्यमंत्रीपदावरून भाजपा-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या मार्गांनी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. संख्याबळाचेदृष्टीने भाजपाकडे जरी जास्त आमदारांची संख्या असली तरी देखील शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तास्थापन करून मुख्यमंत्रीपद घेऊ शकते, असे देखील अंदाज वर्तवले जात आहेत. तर काँग्रेसच्या काही नेत्यांकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मकता देखील दाखवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी काँग्रेसला शिवसेनेशी जवळीक न साधण्याच इशारा दिला आहे. भाजपा व शिवसेनेच्या नाटकात काँग्रेसने पडू नये असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

यावेळी संजय निरूप म्हणाले की, मी माझ्या अनुभवाच्या आधारावर सांगत आहे, शिवसेना कधीच भाजपाच्या सावलीतून बाहेर पडणार नाही. शिवसेना वर्षानुवर्षे अशाचप्रकारे भाजपाशी भांडत आलेली आहे व अखेर जास्त हिस्सा पदरात पाडून घेत ती सत्तेतच बसते. हे पाहता यंदा देखील शिवसेना – भाजपाचेच सरकार येईल. त्यामुळे आता त्यांचा जो दिखावा, तमाशा व नाटक सुरू आहे, त्याचा काँग्रेसने हिस्सा बनू नये. तर लांब उभे राहून जे सुरू आहे ते पाहून त्यावर टाळ्या वाजवायला हव्या. मात्र ज्याप्रकारे आमचे काही नेते शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी दावा केल्या जाण्याची किंवा त्यांच्याकडून काही प्रस्ताव येण्याची आशा बाळगून बसले आहेत, ते पुर्णतः चुकीचे आहे. हे काँग्रेसच्या विचारधारेला नुकसान पोहचवणारे आहे. काँग्रेस पक्ष अगोदरच अत्यंत वाईट काळातून जात आहे. खूप कमी लोकं आहेत, जे आता आम्हाला मतदान करतात, त्यामुळे जर आता शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न झाला, तर काँग्रेससाठी हे नुकसानदायक ठरेल. यामुळेच मी काँग्रेसला सावध करत आहे की, त्यांनी या भानगडीत पडू नये.

माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील काँग्रेसला शिवसेनेबरोबर न जाण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे, सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा या दोहोंमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत मुळीच जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. जनमत मान्य करुन काँग्रेसने विरोधात बसावं असंही त्यांनी म्हटलं आहे.