News Flash

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर सोनिया गांधींचं एका शब्दात उत्तर

सत्तास्थापनेचा तिढा दोन-तीन दिवसांत सुटेल असा विश्वास काँग्रेस आघाडीच्या उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच मुंबईत सुटत नसल्याने आता सर्व राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू नवी दिल्लीकडे सरकला आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दोन-तीन दिवसांत सुटेल, असा विश्वास काँग्रेस आघाडीच्या उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात येत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक दिल्लीत पार पडणार आहे. मात्र काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्तापेचावर मौन बाळगलं आहे. संसदेत पत्रकारांनी सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील सत्तापेचावर विचारलं असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. ‘नो कमेंट्स’ इतकंच उत्तर त्यांनी दिलं.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न असले तरी त्यातील अडथळे दूर झालेले नाहीत. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची काँग्रेसची प्राथमिक तयारी होती. मात्र, काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. हा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. काँग्रेस नेतृत्वाने शिवसेनेला पाठिंबा देण्यास अद्यापही होकार किंवा नकार कळविलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांनी मंगळवारी अहमद पटेल, ए. के. अ‍ॅन्टोनी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. सत्ता स्थापनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. काँग्रेसचे राज्यातील नेते मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत.

गेल्या आठवडय़ात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर चर्चा झाली. पण, अशी काही चर्चाच झाली नसल्याचे शरद पवार यांनी सोमवारी सोनियांच्या भेटीनंतर सांगितल्याने विविध तर्कवितर्क लढविण्यात येत होते. नवी दिल्लीत बुधवारी पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला राज्यातील नेते उपस्थित राहतील. स्वत: पवार किंवा काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व यात सहभागी होणार नाही. किमान समान कार्यक्रम, सत्तापदांची वाटणी यावर बैठकीत चर्चा केली जाईल.

भाजपाचे डावपेच

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त सत्ता स्थापण्याचा प्रयत्न असताना, भाजपचे नेतेही सर्व घडामोडींकडे बारीक नजर ठेवून आहेत. विशेषत: भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यात लक्ष घातले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा ठाम विश्वास भाजपच्या गोटात व्यक्त केला जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होणाऱ्या विलंबामुळे आधीच शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या तीन पक्षांची सत्ता स्थापन होणे कठीण असून, भाजपशी जुळवून घेण्याशिवाय शिवसेनेपुढे पर्याय नसेल, असाही सूर भाजपमध्ये आहे. त्यादृष्टीने डावपेच आखले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 11:16 am

Web Title: congress sonia gandhi ncp shivsena bjp maharashtra political crisis sgy 87
Next Stories
1 राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करा, अमोल कोल्हेंची लोकसभेत मागणी; पर्यावरणमंत्र्यांनी दिले ‘हे’ आश्वासन
2 महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X