राज्यात सत्तेचं नवं समीकरण जुळून येण्याची शक्यता असून काँग्रेस शिवसेनेला समर्थन देत सरकार स्थापन करण्याचा विचार करत असल्याची सुत्रांची माहिती आहे. विचारधारा पूर्पणणे वेगळी असली तरी काँग्रेस शिवसेनेला समर्थन देत सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार करत आहे. काँग्रेसमधील अनेक नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबात सकारात्मक आहेत. मात्र राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध आहे. काँग्रेसच्या बैठकीत यासंबंधी चर्चा सुरु असून अध्यक्ष सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत.

सध्या सर्वांचं लक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेतं यांच्याकडे लागलं आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसने निर्णय घेतल्यानंतर आपला निर्णय जाहीर करु असं सांगितलं आहे. काँग्रेसची बैठक चार वाजता होणार असल्याने राष्ट्रवादीनेही आपला निर्णय त्यांनी जाहीर केल्यानंतर असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने आपली नियोजित पत्रकार परिषद पुढे ढकलली. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, “जोपर्यंत काँग्रेसचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही घेणार नाही, कारण कारण दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यांचा निर्णय आल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. पर्यायी सरकार निर्माण करणं आमची जबाबदारी आहे”. तसंच जो निर्णय घेऊ तो काँग्रेसला सोबत घेऊन असेल असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. दिल्लीत सकाळी काँग्रसेची बैठक पार पडली. यानंतर ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याची माहिती दिली होती. “महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं असून त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. पुन्हा बैठक होणार असून, त्यांचं मत घेऊन निर्णय घेतला जाईल,” असं खरगे यांनी सांगितलं होतं.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी जर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमचं समर्थन हवं असेल तर भाजपापासून विभक्त व्हावं लागले असं म्हटलं होतं. दुसरीकडे मल्लिकार्जून खरगे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र शिवसेनेसोबत जाण्यावर आक्षेप नोंदवला आहे. दोन्ही पक्षांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी असून, दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रश्नच नाही असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं होतं.