संतोष प्रधान, मुंबई

लोकसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र आणि हरयाणात पक्ष संघटनेच्या नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आल्याने दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला त्याचा फटका बसला आहे. याबद्दल दोन्ही राज्यांमधील काँग्रेस नेते पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दोष देत आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांना बदलण्याचा विचार सुरू होता. पण लोकसभा निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय झाला. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. स्वत: अशोक चव्हाण पराभूत झाले. सहा महिन्यांवर आलेली विधानसभेची निवडणूक लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय दिल्लीत घेण्यात आला. प्रदेशाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करता येईल याची चाचपणी करण्यात आली. माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. पण याच काळात राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदावरून पायउतार झाले. काँग्रेस पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आणि निर्णय प्रक्रियाच रखडली होती. यामुळे प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार याची माहिती असूनही पक्षाने अधिकृत घोषणा केलेली नसल्याने थोरात यांची पंचाईत झाली. शेवटी जुलै महिन्याच्या अखेरीस थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. निवडणुकीच्या तयारीला थोरात यांना अल्प वेळ मिळाला. राज्यभर दौरेही करता आले नाहीत.

हरयाणामध्येही नेतृत्व बदलाचा निर्णय असाच रखडला होता. जनाधार असलेले नेते भूपिंदरसिंग हुडा यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपविण्यास राहुल गांधी यांचा विरोध होता. यामुळेच गेले पाच वर्षे अशोक तन्वर यांच्याकडे अध्यक्षपद ठेवण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात हुडा यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन काँग्रेसने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा स्वतंत्र पक्ष काढण्याचा इशारा दिला. शेवटी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात शैलजा यांची प्रदेशाध्यक्षपदी आणि हुडा यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणात नेतृत्व बदलाचा निर्णय होईपर्यंत बराच वेळ गेला होता.

महाराष्ट्रात प्रतिकूल परिस्थिती असतानाही काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले. प्रचारात पक्ष फारच कमी पडला. लोकसभा निकालानंतर लगेचच नेतृत्व बदल झाला असता तर बाळासाहेब थोरात यांना अधिक वेळ मिळाला असता आणि पक्षाची कामगिरी सुधारली असती. हरयाणामध्ये भाजपला ४०, तर काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या. हरयाणात योग्य नियोजन झाले असते तर चित्र नक्कीच बदलले असते. मित्र पक्षांच्या सहाय्याने काँग्रेस सत्तेतही येऊ शकला असता. दोन्ही राज्यांमध्ये निर्णय घेण्यास विलंब लागल्याने त्याचा फटका पक्षाला बसला आहे.

पक्ष संघटनेत बदल करण्याचे निर्णय आधी झाला असता, तर दोन्ही राज्यांमध्ये पक्षाला नक्कीच चांगले यश मिळाले असते.

पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री