शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचं सत्र अद्यापही सुरु आहे. नवी दिल्लीत सकाळपासून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर एकसुत्री कार्यक्रम मांडण्यात आला. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खरगे, सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक सुरु आहे. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट केलं.

विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यात असल्याचं स्पष्ट केलं असून पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असावं अशी चर्चा असल्याची माहिती दिली आहे. बैठकीत ५०-५० फॉर्म्युलावर चर्चा सुरु असून कोणाकडे किती कालावधी असावा यावर चर्चा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान काँग्रेस कार्यकारिणीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी हिरवा कंदील दिला असल्याची सुत्रांची माहिती आहे.

आणखी वाचा- “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी भाजपानंही पाठिंबा दिला असता”

राज्यात बिगरभाजप सरकार स्थापन करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमधील बैठक बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. राज्यातील सत्तापेच सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचा उल्लेख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. पण, शिवसेनेचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले. शिवसेनेशी हातमिळवणी करणार का, या मुद्दय़ावर काँग्रेसने अजून तरी अधिकृतपणे कोणतंही भाष्ट केलेलं नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे पर्यायी सरकार लवकरच स्थापन होईल, असा दावा पत्रकार परिषदेत केला.

आणखी वाचा- “बाबांनी ठरवलंय तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार”

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संयुक्त बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेशी हातमिळवणी, सरकारमधील सहभाग आदी विषयांवर चर्चा झाली. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला अहमद पटेल, वेणुगोपाळ, जयराम रमेश आणि मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे केंद्रीय नेते उपस्थित होते. एकूणच राजधानी दिल्लीत दिवसभर चर्चाचा सपाटा सुरू होता, पण त्यातून निष्पन्न काय झाले हे स्पष्ट झाले नव्हते.