राज्यातील सत्ता स्थापनेच्या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर व काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्यांच्या चर्चांवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी  मल्लिकार्जु खर्गे यांनी काँग्रेस विरोधी पक्षाच्या बाकावरच बसणार असल्याच वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता जर काँग्रेसने विरोधी पक्षाची भूमिका घेतली तर शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला आहे,  आमचा देखील तोच निर्णय आहे. मात्र हायकमांड जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल, असेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले आहे. जयपुरात काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर खर्गे यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. त्यामुळे काँग्रेसशिवाय आता शिवसेना सत्तेत कशी बसणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

खर्गे यांनी यावेळी हे देखील सांगितले की, हायकमांडनी निर्णय घेतल्यानंतरच काँग्रेसची अंतिम भूमिका जाहीर होणार आहे. सध्या महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसंदर्भात विविध वक्तव्यं समोर येत आहेत. कोणी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं बोलत आहे, तर कोणी पाठिंबा न देता विरोधात बसणार असल्याचं सांगत आहे. मात्र मी हे स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही अगोदरपासूनच जनादेशाचा आदर करत काँग्रेस व राष्ट्रवादी विरोधात बसून काम करणार असल्याचं सांगितलेलं आहे.

दुसरीकडे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली असल्याची माहिती समोर आली आहे. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा द्यावा असं बैठकीत सांगितलं असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेना सरकार सत्तास्थापन करण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. सत्तास्थापनेसाठी भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी नकार दर्शवला आहे. तर,काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापनेसाठी अनुकुलता दर्शवली जात आहे.