भाजपा आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं असून रात्री ८.३० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने असमर्थता दाखवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे शिफारस पत्र पाठवलं आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीतही काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी सगळं काही आलबेल असल्याचं म्हटलं आहे.

यशोमती ठाकूर यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी, “ऑल इज वेल, जे अपेक्षित आहे तेच होणार”, असं सांगितलं आहे. यशोमती ठाकूर यांचा नेमका इशारा कशाकडे आहे याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत.

महाराष्ट्रात सत्तस्थापनेचा अभूतपूर्व घोळ निर्माण झाला आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं. आता राष्ट्रवादी काँग्रेस जर रात्री साडेआठ पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करु शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं स्पष्ट होतं आहे.

आणखी वाचा- सत्तेचा गुंता सुटणार : शिवसेनेसोबत जाण्यास अखेर काँग्रेस तयार

दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रात जो राजकीय पेच निर्माण झाला आहे त्याची चर्चा होऊ शकते. त्यामुळे दिल्लीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स समिटसाठी ब्राझिलला जाणार आहेत. मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी वाचा- पर्यायी सरकार स्थापण्यासाठी सर्वाधिकार शरद पवारांना : नवाब मलिक

२४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागला. निकालामध्ये महायुतीला कौल मिळाला. मात्र अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं अशी आग्रही भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे आमचं ठरलंय वरुन आमचं बिनसलंयपर्यंत हे दोन पक्ष आले. त्यानंतर भाजपाने शिवसेना सोबत येत नसल्याने सत्तास्थापनेत असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु केली. मात्र शिवसेनेला जी वेळ देण्यात आली होती त्या वेळेत शिवसेनेलाही दावा सिद्ध करता आला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. यासंदर्भातली शिफारस करण्यात आलेली आहे.