राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याबाबतच्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आहेत. या आघाडीतील शिवसेनेची विचारधारा ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विचारधारेशी भिन्न आहे. मात्र, तरीही राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, भविष्यात या आघाडीत बिघाडी होऊ नये आणि राज्यातील सरकार सुरळीत चालावा यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून कळते.

या समन्वय समितीमध्ये १२ सदस्य असण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि तिन्ही पक्षांच्या प्रमुखांसह इतर नेत्यांचा समावेश असेल असे सांगण्यात येत आहे. भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र येत असल्याने सरकार स्थापन केल्यानंतर पुन्हा कोणत्याही कारणासाठी सरकार अस्थिर होऊ नये यासाठी तिन्ही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाच्या निश्चितीसाठी वेळ लागल्याचे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी दिल्लीमधील गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी सर्व मुद्द्यांवर आपलं एकमत झाले असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या मुंबईत निवडणुकीच्या आधी आघाडीत असणाऱ्या घटकपक्षांशी चर्चा करुन त्यांना माहिती देणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्रिपद तसेच मंत्रीमंडळ वाटपाबाबत कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.