अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुमेध भवार यांच्यावर दहा महिन्यांपूर्वीच्या एका जुन्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याने येथील राजकीय वर्तुळात या कारवाईचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले डिसेंबर २०१८ मध्ये एका कार्यक्रमानिमित्त अंबरनाथ येथे आले होते. या वेळी त्यांच्यावर प्रवीण गोसावी या तरुणाने हल्ला केला होता. आरोपी असलेल्या प्रवीण गोसावी याने दिलेल्या फिर्यादीवरून त्या कार्यक्रमाचे आयोजक अजय जाधव आणि मनसेचे अंबरनाथ विधानसभेचे उमेदवार सुमेध भवार यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सभा आटोपून मंचावरून रामदास आठवले उतरत असताना प्रवीण गोसावी या तरुणाने भेटण्याच्या बहाण्याने आठवले यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी उपस्थितांनी प्रवीण गोसावी याला बाजूला घेत मारहाण केली होती. या मारहाणीत गोसावी जखमी झाला होता. त्यानंतर गोसावी यानेही आपल्या मारहाणीबद्दल तक्रार केली होती. त्या तRोरीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार्यR माच्या आयोजकांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अजय जाधव या रिपाइं पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सुमेध भवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.