मुंबई : हिंदुत्ववाद्यांना मनुवादी म्हणत समाजातील जातीयवादाच्या विरोधात एल्गार पुकारणारे अर्जुन डांगळे, मल्लिका अमरशेख हे दलित चळवळीचे शिलेदार आता भाजपचे साथीदार झाल्याचे चित्र मंगळवारी समोर आले. दलित समाजाकडे केवळ मतपेढी म्हणून न पाहता सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या भाजपला साथ देऊ, भाजपच्या विजयात आम्ही खारीचा वाटा उचलू असा सूर दलित-ओबीसी चळवळीतील नेत्यांनी काढला.

भाजपचे संकल्पपत्र जाहीर झाल्यानंतर दलित, ओबीसी चळवळीतील प्रमुख नेत्यांचा भाजपला पाठिंबा देण्यासाठीचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांनी राष्ट्रवादी आणि विधान परिषदेची आमदारकी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अर्जुन डांगळे, लेखिका मल्लिका अमरशेख-ढसाळ, ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे दिलीपदादा जगताप आणि दिनेश गोडघाटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोरिपचे हरिदास टेंभुर्णे, मेघवाल समाज संघटनेचे प्रेमजी गोहिल, कक्कया समाज संघटनेचे मनोहर कटके, मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामदास कोळेकर, ओबीसी विश्वकर्मा बलुतेदार महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष सुभाष पांचाळ, धनगर समाज सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळू आराप्पा धनगर, सचिव मलम्मा धनगर, खजिनदार रमेश धनगर आणि महिला कामगार संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष भारती राठोड यांनी भाजपला पाठिंबा दिला.

रिपब्लिकन चळवळीतील बहुतांश गट भाजपने सोबत घेतल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले. ज्या भाजपच्या विरोधात राजकारण-समाजकारण केले त्याच पक्षाच्या व्यासपीठावर आल्याचा एक अवघडपणाही त्यांच्यात जाणवत होता.  दिलीपदादा जगताप यांच्या बोलण्यातून ते स्पष्ट झाले. आमचे संपूर्ण आयुष्य भाजपच्या कधी जवळ आलो नाही. प्रथमच या व्यासपीठावर आलो. पण आता खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक पक्षात आल्यासारखे वाटते. कारण भाजपने कधी केवळ मतपेढी म्हणून दलित समाजाकडे बघितले नाही, असे जगताप यांनी नमूद केले.