27 May 2020

News Flash

दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रचाराचा श्रीगणेशा!

माघारीसाठी बरेच प्रयत्न करूनही नाशिक पश्चिममध्ये भाजपला सेनेची बंडखोरी थोपविता आली नाही.

 

  • कमी वेळात अधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड
  •  ‘नाशिक पश्चिम’मध्ये बंडखोरांना शिवसेनेचे बळ?

विधानसभा मतदारसंघनिहाय लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघांत मंगळवारी जवळपास सर्वच उमेदवारांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रचाराचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा केला. कोणी ढोल-ताशांच्या गजरात प्रचार फेरी काढली, तर कोणी मंदिरात नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात केली. सर्वाचे लक्ष लागलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात बंडखोर विलास शिंदे यांच्या प्रचाराच्या शुभारंभास सेनेचे बहुतांश नगरसेवक उपस्थित राहिल्याने या बंडखोरीला सेनेकडून पाठबळ मिळाल्याचे चित्र आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, समित्यांची स्थापना करून नियोजनला गती दिली आहे. प्रचारास केवळ ११ दिवस शिल्लक राहिल्याने कमीत कमी वेळात अधिकतम मतदारांपर्यंत पोहचण्याचा सर्वाचा प्रयत्न आहे.

माघारीसाठी बरेच प्रयत्न करूनही नाशिक पश्चिममध्ये भाजपला सेनेची बंडखोरी थोपविता आली नाही. नांदगावमध्ये सेनेच्या उमेदवारासमोर भाजप पदाधिकारी रत्नाकर पवार यांनी उमेदवारी कायम ठेवली. राजकीय पटलावर अखेरच्या क्षणी बदललेली समीकरणे लक्षात घेऊन सर्व मतदारसंघांत उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. १५ मतदारसंघांत १४८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ७२ अपक्षांचा समावेश आहे. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक १९, तर दिंडोरीत सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार आहेत. काही मतदारसंघात दुरंगी, तिरंगी लढती होतील. नाशिक पश्चिम, नांदगाव हे मतदारसंघ मित्रपक्षांच्या बंडखोरीने चर्चेत आले. प्रमुख राजकीय पक्षांच्या मागे संघटनात्मक ताकद आहे. त्या अनुषंगाने पक्षीय पातळीवर बैठकीचे सत्र सुरू झाले. भाजपच्या महानगर शाखेने विधानसभा निवडणुकीसाठी व्यवस्थापन समितीची स्थापना केली. दसऱ्याच्या मुहूर्तावर कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठकीत निवडणुकीतील नियोजनावर चर्चा झाली. यावेळी उमेदवारांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापन समिती, प्रचार-प्रसिद्धी समिती, विरोधकांचे आरोप परतवून लावण्यासाठी खंडन-मंडन समितींची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. मतदारसंघनिहाय जाहीर सभांच्या नियोजनासाठी खास समिती भाजपने स्थापन केली आहे.

नाशिक मध्यमध्ये महायुतीच्या प्रा. देवयानी फरांदे, आघाडीच्या डॉ. हेमलता पाटील आणि मनसेचे नितीन भोसले यांच्यात तिरंगी सामना आहे. नाशिक पूर्वमध्ये मनसेच्या उमेदवाराने माघार घेतल्याने आघाडीचे बाळासाहेब सानप आणि महायुतीचे राहुल ढिकले यांच्यात मुख्य लढत होणार आहे. नाशिक पश्चिममध्ये महायुतीच्या सीमा हिरे, आघाडीचे अपूर्व हिरे, मनसेचे दिलीप दातीर, माकपचे डॉ. डी. एल. कराड यांच्यासह सेनेचे बंडखोर विलास शिंदे यांच्यात सामना रंगणार आहे. सेनेच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.

गंगापूर गावातून त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा काढून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी सातपूर-सिडको विभागातील सेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. इतरही काही नगरसेवकांनी त्यास दुजोरा दिला. नगरसेवकांच्या उपस्थितीमुळे शिंदे यांच्या बंडखोरीला शिवसेनेचे पाठबळ मिळाल्याची पुष्टी होत असल्याची भाजप नेत्यांना साशंकता आहे.

उमेदवारांनी वेगवेगळ्या भागात मतदारांच्या गाठीभेठी घेऊन शुभेच्छा देत प्रचारास सुरूवात केली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघ आकाराने विस्तृत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 12:47 am

Web Title: dasra election maha rally akp 94
Next Stories
1 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या ताफ्यासाठी सुरक्षेची रंगीत तालीम
2 दसऱ्यामुळे नाशिक सराफ बाजाराला झळाळी 
3 तोतया पत्रकारास खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक
Just Now!
X