दसऱ्यानिमित्त शहरातील बहुतांश उमेदवारांनी मंगळवारी खासगी भेटीगाठी, सार्वजनिक पूजा किंवा तत्सम धार्मिक कार्याना भेटी देत प्रचाराला एक प्रकारे सुरुवात केली. विधानसभा निवडणूक प्रचाराला बुधवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.

बुधवारी बहुतांश उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्त पक्ष, मित्रपक्षातील बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी गोळा होणार आहे. अनेक उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांना बुधवारपासून सुरुवात होणार आहे. पहाटे बगीचे-उद्याने, सकाळी रेल्वे स्थानक, दुपापर्यंत मतदारसंघातील काही विभागांमध्ये प्रचार फेरी, दुपारी गाठी-भेटी, संध्याकाळी पुन्हा प्रचारफेरी आणि चौकसभा, जाहीर सभा हा उमेदवारांचा सर्वसाधरणपणे दिनक्रम असेल. मंगळवारी उमेदवारांनी मतदारसंघातील प्रमुख, ज्येष्ठांच्या भेटी घेत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या, देवदर्शनही केले. त्यानंतर मतदारसंघात विविध ठिकाणी आयोजित सार्वजनिक पूजा, होम, भंडारे किंवा अन्य कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यावर उमेदवारांचा भर राहिला. शिवसेनेचे उमेदवार किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये संध्याकाळी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची लगबग होती.