‘विधानसभेच्या निकालाच्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सत्ता स्थापनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केले. त्यांनी केलेले हे वक्तव्य आमच्यासाठी धक्कादायक होते,’ असे मत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी युतीला बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला रस नव्हता असा आरोप केला आहे.

‘मी स्वत: उद्धव ठाकरे यांना अनेकदा फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. दिवसातून अनेकदा शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा व्हायची. मात्र आमच्यासोबत चर्चा करण्यात शिवसेनेला रस नव्हता. काही मुद्दे असतील तर ते चर्चेने सुटले असते मात्र शिवसेनेने चर्चा करण्याची तयारी दाखवली नाही,’ असं फडणवीस यांनी सांगितलं. पहिल्या दिवसापासूनच शिवसेनेला युती करण्यात रस नव्हता असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

या पत्रकार परिषदेआधी फडणवीस यांनी राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मावळत्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात येईल. त्यामुळे फडणवीस शनिवारी राजीनामा देतील अशी शक्यता होती. मात्र त्यांनी एक दिवस आधीच राजीनामा सादर केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.