मुंबई : राज्यात स्थिर सरकार आणि राम मंदिरावरील बोलघेवडेपणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुल्लेखाने खडे बोल सुनावल्यानंतर शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मवाळ सुरात आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.

राम मंदिरावरून बोलघेवडेपणा केला नव्हता तर केवळ हिंदूंच्या भावना सांगितल्या होत्या आणि राज्य सरकार बहुमताचे नव्हते तरीही शिवसेनेने कधी भाजपला दगा दिला नाही, अशी नरमाईची भूमिका ठाकरे यांनी घेतली.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या जागावाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याने तर्कवितर्काना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे नाव न घेता टीका केली. राज्यात स्थिर सरकारसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच राम मंदिरावरील शिवसेनेच्या विधानांच्या पाश्र्वभूमीवर, राममंदिराबाबत सुरू असलेल्या बोलघेवडेपणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या या जाहीर नाराजीनंतर ठाकरे यांनी शुक्रवारी तातडीने ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावून युतीबाबत चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेचा सूर मवाळ झाल्याचे स्पष्ट झाले.

राम मंदिराचा विषय न्यायालयात आहे. न्यायालयाकडून न्याय मिळतोच. हस्तक्षेपाशिवाय न्याय मिळाला तर त्याचा आनंद आहे. त्यासाठीच जर पंतप्रधान नरेंद्र मोदी विनंती करत असतील तर योग्यच आहे. मी ‘बयानबाजी’ केली नाही, केवळ तमाम हिंदूंच्या मनातील भावना सांगितल्या होत्या, अशी सारवासारव त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी जमल्यास अयोध्येला जाऊन येणार असेही त्यांनी जाहीर केले.

राज्य सरकार बहुमताचे नव्हते तरीही शिवसेनेने कधी भाजपला दगा दिला नाही, असेही ठाकरे यांनी आवर्जून नमूद केले. शिवसेनेने विकासासाठी नेहमीच पाठिंबा दिला. आमचा विकासाला विरोध नाही. ‘आरे’ असो की ‘नाणार’, आमची भूमिका स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री शिवसेनेची यादी करून पाठवतील हे आधीच सांगितले होते. मी कायमच उपहासाने बोलत नाही, असे सूचक विधानही ठाकरे यांनी केले.

दरम्यान, युतीची चर्चा सुरू असून कधीही जागावाटप अंतिम होऊ शकते. जागावाटपात जे हाती येईल ते घेऊन लढायचे आहे, असे विधान शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना केले. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समाधानी असतील तरच जागावाटप अंतिम होईल, असेही त्यांनी नमूद केले.

‘सूत्र ठरलेच आहे, दोन दिवसांत निर्णय’ : युतीबाबत आधीच ठरले असून निर्णय दोन दिवसांत होईल, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. जागावाटपाचे सूत्र लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ठरले होते. माध्यमांनी मात्र  वेगवेगळे आकडे छापले, असे त्यांनी सांगितले. मित्रपक्षांना १८ जागा सोडल्यानंतर उरलेल्या २७० जागांचे वाटप भाजप-शिवसेनेत होईल, असे संकेतही त्यांनी दिले.

सूत्र ठरलेले नाही – पाटील : भाजप-शिवसेना युती नक्की होईल. पण युतीचे सूत्र अद्याप अंतिम झालेले नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यावर अंतिम निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.