नाशिकमध्ये आम्ही जी पाच वर्षात कामं केली, ती अनेकांकडून २५ ते ३० वर्षात देखील झालेली नाहीत. मात्र, त्याच्यानंतरचा निवडणुकीतील जो पराभव होता, तो माझ्या जिव्हारी लागला. कारण, या शहरात मी व माझ्या सहकाऱ्यांनी मनापासून काम केलं होतं. त्यामुळे नाशिकमध्ये आम्ही जे कामं केलं ते आम्ही करायला पाहिजे होतं का नव्हत? असा प्रश्न देखील मला पडला आहे. तसेच, नाशिकरांनी कितीजरी आम्हाला त्या निवडणुकीतून बाजूला सारलेलं असलं, तरी  देखील माझं नाशिकवरचं प्रेम कमी झालेल नाही. पुन्हा संधी मिळाली तर यापेक्षा उत्तम काम करून दाखवेन, असं राज ठाकरे यांनी बुधावारी नाशिक येथे झालेल्या प्रचारसभेदरम्यान म्हटलं. तसेच, यावेळी त्यांनी पराभव आणि विजय हे येतंच असतात असेही सांगितले.

यावेळी राज म्हणाले की, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं, असं चित्र मला तुम्हाल दाखवायचं होतं, ते मी तुम्हाल दाखवलं देखील. मात्र एवढं सगळं केल्यानंतर हाती काय आलं तर पराभव. मग तुम्हाल नक्की हवयं तरी काय? निवडणुकीच्या अगोदर सांगायचं आम्ही हे काम करू आणि काम केल्यानंतर जर पराभव येत असेल, तर काम मोजतयं कोण? कोण तुमच्यासाठी काम करणार? जर त्या केलेल्या कामांना काही अर्थच नसेल, त्याद्वारे तुम्हाला समाधानच मिळणार नसेल आणि त्याच्यानंतर आता जो काही कारभार सुरू आहे. तो संपूर्णपणे नाशिक शहर ओरबाडण्याचा प्रकार सुरू आहे, तो तुम्हाल मान्य आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच, ते पुढे म्हणाले की,  आज नाशिकमधील रस्त्यांची अवस्था काय झाली आहे? मात्र सत्तेत असणारे बेफिकीर आहेत. हे पाहता मला खरच वाटतं की नाशिकमध्ये आपण जे काम केलं ते करायला पाहिजे होतं का नव्हत? की तुम्हाला हीच कामं आवडतात. अशाचप्रकारची लोकं जर तुम्हाल आवडत असतील तर मग कशाला पाहिजे प्रचार? पण या गोष्टी कितीही जरी झाल्या, तरी नाशिकरांनी कितीही जरी आमच्या लोकांना त्या निवडणुकीतून बाजूला सारलं, तरी माझं नाशिकवरचं प्रेम काही कमी झालेलं नाही. पुन्हा संधी मिळाली, तर यापेक्षा उत्तम काम करून दाखवेन. कारण, शहरं चांगली करणं, माझा महाराष्ट्र चांगला करणं ही माझी आवड आहे. जे परदेशात घडतं ते माझ्या महाराष्ट्रात का होऊ शकत नाही?  असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

याचबरोबर त्यांनी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली. कलम ३७० बद्दल बोललं जातं, महाराष्ट्रातील बेरोजगारीच्या प्रश्नांबाबत कोण बोलणार? असा सवाल देखील केला. महाराष्ट्राची उद्योगधंद्यात वाट लावली असल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला. नोटाबंदीच्या निर्णय अयशस्वी ठरल्याचे सांगत मोदी सरकारला धारेवर धरले.