यंदाची लढाई प्रणिती शिंदे यांच्यासाठी कठीण
सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून टिपू सुलतानच्या वंशजांपैकी एक मानले जाणारे मन्सूर अली शाह निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. ऑल इंडिया मुस्लीम लीगच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे.
ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे प्रदेश सरचिटणीस हाजी इम्तियाज पीरजादे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. मन्सूर अली शाह हे सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी तयार नसतील, तर आपण स्वत: लढतीला तयार आहोत, असे पीरजादे यांनी सांगितले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना आणि एमआयएमच्या इच्छुकांनी कंबर कसली असताना टिपू सुलतानचे वंशज रिंगणात उतरल्यास येथील लढत तुल्यबळ ठरण्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.
बहुभाषक आणि बहुजातींसह मुस्लीम आणि पद्मशाली समाजाचा प्रभाव असलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघात २०१४ सालच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात नगरसेवक तौफिक शेख यांच्या माध्यमातून ताकद पणाला लावली होती. तर शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतु त्या चुरशीच्या लढतीत प्रणिती शिंदे विजयी झाल्या होत्या. त्या वेळी दुसऱ्या क्रमांकाची मते एमआयएमने घेतली होती. तर शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर होती.
या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने पुन्हा प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी मिळेल असे गृहीत धरले जात आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे महेश कोठे व काँग्रेसमधून नुकतेच सेनेत दाखल झालेले माजी आमदार दिलीप माने जोरदार तयारी करीत आहेत. तर ‘एमआयएम’ने फारूख शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आता ऑल इंडिया मुस्लीम लीगनेही या मतदारसंघात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 27, 2019 3:12 am