राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम असून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. शिवसेना आमदाराला भाजपाने ५० कोटीची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांना खुलं आव्हान दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकार तयार करताना घोडेबाजार करणार नाही असं सांगत विरोधकांना आव्हान दिलं आहे.

“भाजपा सरकार तयार करताना कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी टीका करताना भाजपा आता घोडेबाजार चालवत आहे असंही म्हटलं होतं. फक्त शिवसेनेच्याच तर आमच्याही म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या आमदारालाही ऑफर देण्यात आली असाही आरोप त्यांनी केला आहे. मात्र हिरामण खोसकर या काँग्रेस आमदाराने मला कोणतीही ऑफर आली नाही असं म्हणत विजय वडेट्टीवार यांचा दावा फेटाळला होता.

पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत टीका केली. “विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेली वक्तव्य आम्ही समजू शकतो, पण आमच्या सोबत केंद्रात आणि राज्यातही राहायचं आणि खालच्या पातळीवर टीकाही करायची, हे चालणारं नाही,” अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला सुनावलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मी फोन करुनही त्यांनी घेतला नाही अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. चर्चा आम्ही नाही तर शिवसेनेने थांबवली असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना शिवसेनेला टोला लगावत ज्यांच्याविरोधात मतं मागितली त्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला वेळ होता पण आमच्याशी नाही असं म्हटलं. “चर्चा आम्ही थांबवलेली नाही, दारं खुली होती. परंतु चर्चा शिवसेनेकडून बंद झाली, यात पूर्ण सत्य आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेली वक्तव्य आम्ही समजू शकतो. पण आमच्या सोबत केंद्रात आणि राज्यातही राहायचं आणि खालच्या पातळीवर टीकाही करायची, हे चालणारं नाही,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. “उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची लोकं ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत, त्यांनी सरकार होत नसतं, आम्हाला उत्तर देता येत नाही, असं समजू नये. जबरदस्त भाषेत उत्तर देण्याची क्षमता आमच्यातही आहे, पण आम्ही देणार नाही. आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही,” असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

“अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नव्हतं. मी तसं अमित शाह आणि नितीन गडकरी यांना विचारलं मात्र त्यांनीही असं काहीही ठरलेलं नाही असं सांगितलं. या संदर्भातले समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते,” असं मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.

मी पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आभार मानत महायुतीचं सरकार येईल असं म्हटलं होतं असं सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सरकार बनवण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचं सांगितलं होतं, तो आमच्यासाठी धक्का होता, कारण जनतेने महायुतीला मतदान केलं होतं अशी माहिती दिली.