मातोश्रीबाहेर न पडणाऱ्यांनी इतरांच्या पायऱ्या झिजवल्या. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं एवढा एकच अजेंडा शिवसेनेने राबवला. एरवी मातोश्रीबाहेर न पडणाऱ्यांनी इतरांच्या पायऱ्या झिजवल्या, लाचारी पत्करली हे महाराष्ट्राने पाहिलं अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेने लढलेल्या जागांपैकी त्यांना अवघ्या ५४ जागांवर यश मिळालं. त्यांचं यश साधारण ४५ टक्के होतं. तर भाजपाने ७० टक्के यश मिळवलं. मात्र नंबरगेम लक्षात आला तेव्हा शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हा दावा केला. असं काहीही ठरलं नव्हतं याचा पुनरुच्चारही देवेंद्र फडणवीस यांनी केला. सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आणखा वाचा- शिवसेना सोनिया गांधींची करत असलेली लाचारी लखलाभ : देवेंद्र फडणवीस

आम्ही शिवसेना आमच्यासोबत येईल याची वाट पाहिली. मात्र नंबर गेम लक्षात आल्यावर शिवसेनेने नको त्या मागण्या केल्या. आम्ही त्यांना काहीही वचन दिलं नव्हतं. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ही अट तर ठरलीच नव्हती असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अमित शाह यांनीही हेच स्पष्ट केलं होतं. मात्र शिवसेनेने अवास्तव मागणी केली. ती पुरवणं शक्य नव्हतं, शिवसेनेने हट्ट न सोडल्याने व दुसऱ्या पक्षांसोबत गेल्याने आम्हाला नाईलाजाने अजित पवारांसोबत जावं लागलं. मात्र शिवसेनेनेे किती लाचारी पत्करली हे आपल्याला दिसून आलं असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.