गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. अमित शाह यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन पहिल्यांदाच माझ्यावर, ठाकरे कुटुंबीयावर खोटेपणाचा आरोप केला याचं दुःख वाटलं असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोप झाला आहे. मुंबईतल्या रंगशारदा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  अमित शाह यांच्या नावाचा वापर करुन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  खोटं बोलले आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. सत्तेची खुर्ची माणसाला किती वेडं करते हे मी पाहिलं. देवेेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी चर्चा थांबवली हे खरं आहे. ५०-५० चा फॉर्म्युला ठरलाच नव्हता हे देवेंद्र फडणवीस म्हणाले हे साफ खोटं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद मी पाहिली ती पाहून मला आनंदही वाटला आणि दुःखही वाटलं. झाला की अनेक विकासकामांचा पाढा त्यांनी वाटला त्यावेळी त्यांनी उल्लेख केला की शिवसेना सोबत होती की नाही? असा उल्लेखही त्यांनी केला. आम्ही सोबत नसतो तर ही विकासकामं तुम्ही करु शकला असता का? तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात मी काहीही बोललो नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शब्द देऊन फिरवण्याची वृत्ती शिवसेनेची नाही तर भाजपाची आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अमित शाह आणि कंपनीविरोधात अविश्वास आहे असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर मला खोटं ठरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार नाही. माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला ते दुर्दैवी आहे. काळजीवाहूंनी असा काही प्रयत्न करु नये असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी खोटेपणा केलेला नाही, भाजपा खोटेपणा करत आहे. सातत्याने भूमिका बदलण्याचा प्रकार भाजपाने केला आहे मी दिलेला शब्द फिरवलेला नाही. मातोश्रीवर जेव्हा अमित शाह आले होते तेव्हा जे काही ठरलं होतं ते देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक आहे तरीही ते मला खोटं ठरवत आहेत असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा माझा उल्लेख लहान भाऊ असा केला होता. आता त्यामुळे कुणाला पोटशूळ उठला असेल तर त्यावर काय बोलणार? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं. भाजपाशी शत्रुत्त्व नाही मात्र त्यांनी खोटं बोलू नये. शब्द द्यायचा आणि वेळ मारुन फिरवायचा हे भाजपाचं धोरण आहे आमचं नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विश्वासाने सांगत आहेत की भाजपाचंच सरकार येणार. संख्याबळ नसताना ते कोणत्या विश्वासावर ही बाब मांडत आहेत? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.