विदर्भाच्या विकासासाठी सरकारने विशेष लक्ष पुरवले आहे. विदर्भात उद्योगांसाठी विजेचे दर कमी करावेत, अशी मागणी आम्ही सातत्याने करीत होतो, पण त्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने दुर्लक्ष केले. आम्ही ३ रुपये कमी दराने वीज देतो. आता अनेक उद्योग या भागात येऊ लागले आहेत. येत्या काळात विदर्भाला विकासाच्या इंजिनाची गती मिळणार आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

अमरावतीचे भाजपचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख आणि बडनेराच्या शिवसेनेच्या उमेदवार प्रीती बंड यांच्या प्रचारार्थ येथील नेहरू मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, जगदीश गुप्ता, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार अभिजीत अडसूळ, महापौर संजय नरवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या १८ मिनिटांच्या भाषणात सरकारच्या कामाचा आलेख मांडला.

मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये जेवढय़ा वेळा अमरावतीत मी आलो, तितक्या वेळा कुठलाही मुख्यमंत्री आला नसेल. अमरावती शहरावर माझे प्रेम आहे. नागपूरनंतर अमरावती हे विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. शहर विकासाच्या कामांचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि एक आधुनिक शहर म्हणून अमरावतीची ओळख बनू लागली आहे. शहराचे चित्र बदलले पाहिजे, यासाठी मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्याकडे अधिक लक्ष देण्यात आले. एकटय़ा अमरावती शहरासाठी ५ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी देण्यात आला आहे. प्रत्येकाला घर देण्याचा आमचा संकल्प आहे. नांदगावपेठ एमआयडीसी क्षेत्र आधी ओसाड होते, त्या ठिकाणी १९ उद्योग आले.

टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून सुमारे ३० हजार लोकांना रोजगार मिळाला. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. त्याचा फायदा अमरावतीला मिळणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, पुढल्या पाच वर्षांमध्ये १ लाख कुटुंबांना बचत गटांशी जोडले जाणार आहे. या बचत गटांना १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.

प्रत्येक तरुणाला रोजगार मिळूवन  देण्याचे काम सरकारतर्फे केले जाणार आहे. शहरीकरण झपाटय़ाने होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर त्याकडे संधी म्हणून पहावे लागेल. लोकांची क्रयशक्ती वाढली की शहरे चांगली होतात. भविष्याचा वेध घेऊन शहरे अधिक विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.