देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनात भाजपाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपाच्या ११ आमदारांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आता भाजपाकडून फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावेळी ते म्हणाले, “गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सक्षमपणे कारभार सांभाळला. गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना त्यांनी अनेक प्रश्न खुबीनं सोडवले. त्यामुळे त्यांच्याशिवाय कोणाचेही नाव पुढे येऊ शकत नाही.” या प्रस्तावाला भाजपाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे, गणेश नाईक, संजय कुटे, देवयानी फरांदे, देवराव भोईर, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले  यांनी अनुमोदन दिले.

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांचे आभार मानले. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्य करु असे ते यावेळी म्हणाले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र, संविधानाच्या अनुरुप राज्य चालवायचे असल्याचे सांगत गेल्या ५ वर्षांपेक्षा अधिक चांगले काम करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचीही आज संध्याकाळी ५ वाजता बैठक होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाईल. या पदासाठी अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. तर विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांची नावे चर्चेत आहेत.