बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरलेल्या भाजपानं विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला आहे. चार दिवसातच मुख्यमंत्री राजीनामा द्यावा लागलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भाजपानं विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. बुधवारी सायंकाळी ही घोषणा करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाचवाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. पण, न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर बहुमत नसल्याचं सांगत फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपाचं सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन होत असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र दिल्यानंतर भाजपानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा दावा केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्यांदा फार काळ राहता आलं नाही. बहुमताअभावी सरकार कोसळल्यामुळे विरोधी बाकांवर बसावे लागले असून, भाजपानं विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याचीही निवड केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विरोधी पक्षनेते म्हणून दिसणार आहे. बुधवारी सायंकाळी भाजपानं त्यांच्या नावाची घोषणा केली.

दरम्यान, फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेली असताना दुसरीकडं महाविकास आघाडीची शपथविधीसह खातेवाटपावर खलबतं सुरू आहेत. तिन्ही पक्षांचे नेते या बैठकीला हजर आहेत. गेल्या दोन तासांपासून आघाडीची बैठक सुरू आहे.