औरंगाबाद : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले राणा जगजितसिंह पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर या दोघांना भाजपने पहिल्या यादीत स्थान दिले आहे. त्यामुळे प्रतिष्ठेच्या भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्याविरोधात गोरठेकर अशी लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे औसा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपच्या निकषांनुसार पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या हरिभाऊ बागडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. काही मतदारसंघांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असून त्यात लोहा मतदारसंघाचाही समावेश आहे.

औसा मतदारसंघासाठी अभिमन्यू पवार यांच्या नावाची घोषणा उमेदवारांच्या यादीत करण्यात आली. खरे तर औसा हा मतदारसंघ गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात होता. त्याऐवजी लातूर ग्रामीण हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद तशी जेमतेम म्हणता येईल एवढीही नाही. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार कोण, हे अद्याप अस्पष्ट असले तरी या मतदारसंघात भाजपचे रमेश कराड निवडणुकीसाठी तयारी करत होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना ऐन वेळी राष्ट्रवादीत जाण्यापासून भाजपच्या नेत्यांनी रोखले होते. लातूर ग्रामीणमधून उमेदवारी मिळेल, अशी आशा त्यांना होती. त्यामुळे लातूर ग्रामीणमध्ये सेना-भाजपत वाद होऊ शकतो.

लोहा मतदारसंघावरून वाद?

नांदेड जिल्ह्य़ातील लोहा हा शिवसेनेचा मतदारसंघ, पण भाजपकडून आणि विशेषत: भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लोहा मतदारसंघातून जवळच्या व्यक्तीला उमेदवारी द्यायची होती. तसे त्यांनी प्रयत्नही केले. या मतदारसंघात माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे हेसुद्धा प्रयत्नशील होते. मात्र, ही जागा शिवसेनेने स्वत:कडेच राखली. मुक्तेश्वर धोंडगे यांना लोह्य़ातून उमेदवारी दिली जाईल, असे त्यांचे समर्थक सांगतात. अब्दुल सत्तार यांना शिवसेनेने उमेदवारी दिली असल्यामुळे सिल्लोड मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते चिडलेले आहेत. तर माजलगाव मतदारसंघाचे भाजपचे आमदार आर. टी. देशमुख यांना उमेदवारी नाकारून त्यांच्याऐवजी रमेश आडसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आडस हे त्यांचे मूळ गाव. ते केज मतदारसंघात येते. या मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. मात्र उमेदवारी माजलगाव मतदारसंघातून मिळाली. या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, ‘मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविलेली होती. माझ्या गावापासून माजलगाव हा मतदारसंघ जवळ आहे. अन्य बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थेतील कार्यकर्ते भाजपचे आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून काहीएक अडचण होणार नाही.’ निवडणुकीच्या रिंगणातील पट मांडताना केलेले हे नवे बदल मतदार कसा स्वीकारील, याची उत्सुकता सर्वत्र आहे.