विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यावेळी सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. अभिनंदनाच्या ठरावाला देवेंद्र फडणवीस यांनी मार्मिक भाषेत उत्तरे दिली. “मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा,” असं सांगत फडणवीसांनी पुन्हा सत्तेत  येण्याचे संकेत दिले.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहाचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह सभागृहाच्या सदस्यांनी अभिनंदनपर भाषण केली.

त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर दिलं.  फडणवीस म्हणाले, “बाळासाहेब थोरात म्हणाले, त्याप्रमाणे आमचा डीएनए विरोधी पक्षाचाच आहे. विरोधी पक्षामध्ये मी बराच काळ काम केलं आहे. आतापर्यंत संविधानाच्या आणि नियमाच्या आधारेच मी मुद्दे मांडतो. मी कालही नियमाला धरून बोललो. पुढेही विरोधी पक्षनेता म्हणून नियमांच पुस्तक आणि संविधान याच्या पलिकडे जाऊन कोणताही मुद्दा रेटून नेणार नाही. जेव्हा जेव्हा संविधानाला अनुसरून आणि नियमाला धरून काम होणार नाही. तेव्हा तेव्हा मी नियमाप्रमाणे काम व्हावं म्हणून काम करेल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो. उद्धव ठाकरे यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध. काही कारणानं ते दुरावले. पण, तरीही मी मुख्यमंत्र्यांना आश्वासन देतो की, कधीही आवाज द्या. आम्ही नेहमीच सहकार्य करू. जनहिताच्या निर्णयासाठी आम्ही सोबत असू, पण, सरकार जर जनतेच्या आकांक्षाची पूर्तता करत नसेल तर आसूड ओढायला मागे पुढे पाहणार नाही,” असं म्हणत अभिनंदनाच्या भाषणाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले,”अभिनंदनाच्या ठरावावर अनेकांनी चांगली भाषणं केली. पण त्यात काहींची भाषण शोले सिनेमातील लडका तो अच्छा है अशा पद्धतीची होती. विरोधी पक्ष म्हणजे शत्रू नव्हे. काल जे विरोधात होते, ते आज सरकामध्ये बसले आहेत. लोकशाहीमध्ये अशा गोष्टी होत राहतात. त्यामुळे मी म्हणतो की, मी पुन्हा येईल. “मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा,” असा शेर सुनावत फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना उत्तर दिलं.