केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने मेगाभरती, महापोर्टल, ऑनलाईन भरती यांच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगारांची सर्वात मोठी फसवणूक केली असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जालना या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

तरुणांना रोजगार नाही, कारखाने, कंपन्या बंद पडत आहेत . सरकारची फसवी नोकरभरती ही मुळात तरुणांसाठी नव्हतीच. ती तर त्यांचा पक्ष भरण्याची जाहिरात होती हे आता सिद्ध झाले आहे. खोट्या आश्वासनांचं गाजर देत मोदींनी तरूणांना वेडं करून सोडलं होतं. आता तरी शहाणे व्हा. डोळे उघडा. सोडा त्या मोदींचा नाद. हे सरकार बरखास्त केल्याशिवाय आता आपल्याला शांत राहायचं नाही असा निर्धारही मुंडे यांनी केला.

भगवान की लाठी जब चलती है तब… शरद पवार यांचंही तसंच आहे… मारत नाही पण मार बसला की तो पुन्हा उठत नाही. म्हणूनच पवार साहेबांचा नाद कधी करायचा नाही. राष्ट्रवादीला संपवणे काही सोपे नाही असे मुंडे म्हणाले.

पोलिसांना दिली समज

मागील काही दिवसात पोलिसांवरचा ताण खूप वाढला आहे. आमच्या सभेत पोलीस तरुणांना डी सर्कलमध्ये येण्यासाठी अडवत होते. पोलिसांना माझी विनंती आहे की आमच्या या सभेतील जनता शरद पवार यांच्या प्रेमापोटी आलेली आहे. महाजनादेश यात्रेची गोष्ट वेगळी आहे तिथे मुख्यमंत्री रोषाचे धनी आहेत अशा शब्दात पोलिसांना समज दिली आणि सरकारला चिमटा लगावला.