वसंत मुंडे, बीड

भाजपच्या मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारांच्या वैयक्तिक कामांकडे दुर्लक्ष करत सार्वजनिक विकासकामांना प्राधान्य दिल्याचे सांगितले. असे करताना राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून नेत्यांची बेरीज केली, पण धनंजय यांनी मतदारसंघात वैयक्तिक कामांवर भर देत गावागावात कार्यकर्त्यांची फळी उभी केली. परिणामी, भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यात यश आले. परळी मतदारसंघासह चार मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाल्याने धनंजय यांचे वर्चस्व वाढले. दुसरीकडे भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळत असताना पंकजा यांचा पराभव झाल्याने त्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पक्ष नेतृत्व आता काय निर्णय घेते, याकडे लक्ष आहे.

परळी मतदारसंघातून पाच वर्षांपूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा २५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. मुंडे बहीण-भावाला एकाचवेळी राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने परळी मतदारसंघावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी दोघांनी लक्ष घातले. मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरुवातीपासून पारंपरिक राजकीय पद्धत बदलण्याचे धोरण राबवत व्यक्तिगत कामापेक्षा सार्वजनिक कामांना प्राधान्य दिल्याने कार्यकत्रेही या अपरिचित कार्यपद्धतीने गोंधळात पडले. धनंजय यांनी वैयक्तिक कामांवर भर देत गावपातळीवर कार्यकर्त्यांची फळी उभी केली. त्यामुळे अडीच वर्षांंपूर्वी परळी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करून मतदारांनी पंकजा यांना सावध केले होते. धनंजय यांना राजकीय पातळीवर िखडीत गाठण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडून आपल्या बाजूने घेण्यावरच पंकजा यांनी लक्ष केंद्रित केले. राष्ट्रवादीचे सुरेश धस यांना भाजपात घेऊन आमदार केले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना पाच वर्ष सत्तेच्या माध्यमातून सांभाळले. तालुकापातळीवरही राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना भाजपात घेतल्याने नेत्यांची ‘बेरीज’ झाली, पण पक्षाचा सामान्य कार्यकर्ता दुरावला. परळी मतदारसंघातून लोकसभेत २०  हजारांचे मताधिक्य मिळाल्याने स्थानिक निवडणुकीत लोकसभा, विधानसभेत आपला विजय होणार असा कयास त्यांनी बांधला. प्रचारातही विकासकामांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून धनंजय हे आपल्याला त्रास देण्यासाठीच राजकारणात आहेत यावरच भर दिला. दसरा मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उदयनराजे भोसले परळीत आल्याने कार्यकर्त्यांनाही विजयाचा विश्वास नडला. शेवटच्या टप्प्यात धनंजय यांच्या कथित वक्तव्यावरुन मोठा गदारोळ उठला तरी याचा परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. काँग्रेसचे प्रा. टी. पी. मुंडे यांना भाजपात घेतल्याने पक्षाचे जुने काही नेते शांत झाले. समाजमाध्यमातील लोकप्रियतेमुळे स्थानिक पातळीवरील माध्यमांपासूनही त्या कायम दूर राहिल्या.

धनंजय यांनी मात्र सुरुवातीपासूनच ही निवडणूक कोणाला पाडण्यासाठी नाही, तर विकासासाठी असल्याचे पटवून दिले. मतदानात कोणत्याच भागात भाजपला मताधिक्य वाढले नसल्याने धनंजय यांना सर्वत्र पाठिंबा मिळाला. मागच्यावेळी तिरंगी लढतीत पंकजा यांचा २५ हजारांच्या मतांनी विजय झाला होता. त्यामुळे मते विभागली जाणार नाहीत याची काळजी धनंजय यांनी घेतली. पंकजा यांनी थेट लढतीची हिंमत केल्याने भाजपला पराभवाचा धक्का बसला.  स्थानिक पातळीवर स्वत: आणि बहीण डॉ. प्रीतम मुंडे यांच्या व्यतिरिक्त इतरांकडे अधिकार नसल्यामुळे जवळचे कार्यकत्रे सत्तेमुळे सोबत राहिले इतकेच.