01 June 2020

News Flash

मला जग सोडून जावं वाटतंय; नव्या भावांनी विष कालवलं – धनंजय मुंडे

पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे भावूक

(संग्रहित छायाचित्र)

भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी अर्वाच्च भाषेत टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध परळी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, “आपल्याला संपवण्याचा प्रयत्न होत आहेत. मी कधीही बहिणीला उद्देशून असं बोललो नाही. ते लोकांसाठी होतं. नव्या आलेल्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवलं असून, मला जग सोडून जावं वाटत आहे,” असं सांगत धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सर्व आरोप फेटाळून लावले.

धनंजय मुंडे यांच्या १७ तारखेला विडा येथे झालेल्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यातील धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात असताना, धनंजय मुंडे यांनी रविवारी दुपारी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन त्या वक्तव्यावर भूमिका मांडली. वक्तव्यावरून झालेल्या आरोपावर बोलताना मुंडे भावूक झाले. ते म्हणाले, “माझ्या मागे कुणाचं नाव नव्हतं, लोकांची कामं करून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. स्वतःच्या कर्तृत्वानं नायक झालो, पण आता खलनायक करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी कधीही कुणाचं मन दुखावेल असं बोललो नाही. मतांच राजकारण कधीच केलं नाही. ज्या बहिणीसाठी मी हा मतदारसंघांचा त्याग केला होता. मी नाती कशी सांभाळतो हे जनतेला माहिती आहे. मात्र, नव्यानं आलेल्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी ते बहिणीसाठी नाही, तर जनतेसाठी बोललो होतो. कालचा वाद वेदनादायी असून आता जग सोडून जावं असं वाटत आहे,” असं सांगतांना धनंजय मुंडे भावूक झाले.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले,”मी १७ तारखेला बोललो, ती क्लिप १९ तारखेला व्हारयल झाली. माझी भाषण लाईव्ह दाखवण्यात आली. जर मी चुकीचं बोललो असतो, तर लगेच माझ्यावर टीका झाली असती. ती क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून चौकशी करावी. त्यात एका शब्दाची चूक दिसली तर फाशी जाईल. हे विष कालवण्याऐवजी एक शब्द टाकला असता, तर मी लगेच माघार घेतली असती. एका व्यक्तीला संपवण्यासाठी किती डोकी, किती लोक कामाला लागलं हे लगेच लक्षात येतं. इतक्या खालच्या पातळीला राजकारण जाणार असेल, तर तसं करणं मला शक्य नाही. माझे आणि पंकजा मुंडे यांची भाषणं ऐका. त्या मला चोर म्हणाल्या, दुष्ट राक्षस म्हणाल्या. पण मी काही बोललो नाही. माझ्यावर संस्कार आहेत. माझ्या जागी कुणीही असता तर वेगळी प्रतिक्रिया दिली असती. मात्र, मी तस करणार नाही. मला खलनायक करण्याचा प्रयत्न होत आहे. आमच्या नात्यात विष कालवणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की, त्यांनाही नाती आहेत. मलाही बहिणी आहेत. पण, या आरोपांमुळं जगाव की, मरावं अशी स्थिती झाली आहे,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

काय म्हणाले धनंजय मुंडे येथे पहा –

गुन्हा दाखल झाल्यासंदर्भात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “कालच्या प्रकारानंतर माझ्याविरुद्ध लगेच केस दाखल केली जाते. आमच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीची दखलही का घेतली जात नाही?” असा सवाल त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 12:57 pm

Web Title: dhananjay munde rejected all allegations about his remarks bmh 90
Next Stories
1 सासऱ्याचा खून करणाऱ्या जावायास जन्मठेप
2 शेतक-याकडून पाच हजारांची लाच स्विकारताना सरपंच पकडला
3 अस्मितेचे मुद्दे पुढे करून मूळ प्रश्नाला बगल
Just Now!
X