|| निखिल मेस्त्री

सध्या विविध समाजमाध्यमे प्रचलित असतानाही राजकीय पक्ष आजही तीन आसनी रिक्षांच्या माध्यमातून प्रचार करताना दिसत आहे. डिजिटल युगातही रिक्षांच्या माध्यमातून प्रचाराचा ओघ कमी झाल्याचे दिसून येत नाही.

निवडणुकीत प्रचार करण्यासाठी पूर्वीपासूनच रिक्षांचा वापर केला जातो. मात्र सध्या प्रचाराचे अनेक मार्ग असतानाही रिक्षांचा वापर कमी झालेला दिसून येत नाही. रिक्षामार्फत केलेल्या प्रचारामुळे काही रिक्षामालकांना व चालकांना या निवडणुकांच्या दिवसांमध्ये सुगीचे दिवस आले असून प्रचारासाठी रिक्षा भाडय़ाने दिल्यामुळे बऱ्यापैकी रोजगार मिळत आहे, असे रिक्षाचालकांनी सांगितले. दिवसाकाठी प्रवासी फिरवून मिळणाऱ्या पैशापेक्षा अधिकचे पैसे या प्रचारासाठी मिळत असल्यामुळे काही रिक्षाचालक आपली रिक्षा प्रचारासाठी फिरवताना पाहायला मिळत आहेत.

डिजिटल प्रणाली अस्तित्वात नसताना रिक्षावर भोंगे लावून त्याद्वारे राजकीय पक्ष आपला प्रचार खेडोपाडी, ग्रामीण तसेच शहरी भागात करत होते. यामध्ये कालांतराने बदल घडत गेले. कागदी पोस्टरची जागा विविध तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे फ्लेक्स व बॅनर यांनी घेतली आहे. पूर्वी भोंगे वाजविण्याची यंत्रसामुग्रीही आता बदललेली व विकसित झालेली आहे. आता असलेल्या नव्या प्रणालीच्या सोयीस्कर भोंग्यामुळे पूर्वीच्या प्रचारापेक्षा आताचा प्रचार सोपा झाला आहे.