नमिता धुरी/मानसी जोशी

‘लोकसत्ता’च्या ‘गोलमेज’मध्ये तरुण प्रतिनिधींचे आवाहन

मुंबई : सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजणारे मुद्दे अगदी वरवरचे आहेत. कलम ३७० हा काही महाराष्ट्राचा मुद्दा नाही किंवा धार्मिक मुद्दय़ांवरूनही दिशाभूल केली जात आहे. अशा वेळी तरुणांमध्ये राजकीय साक्षरता येणे महत्त्वाचे आहे. फसव्या मुद्दय़ांवर मतदान न करता उमेदवाराचे काम बघून तरुणांनी मतदान करावे, असे आवाहन ‘लोकसत्ता’च्या मुंबई कार्यालयात झालेल्या तरुणांच्या ‘गोलमेज’ चर्चासत्रात तरुण मतदारांनी केले.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यंदा जवळपास एक कोटीहून अधिक मतदार २५ वर्षांच्या खालील वयोगटातील आहेत. मात्र, तरुणांभोवती केंद्रित असलेल्या प्रश्नांवर अभावानेच राजकीय चर्चा होताना आढळते. या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’च्या मुंबई कार्यालयात तरुण मतदार प्रतिनिधींचे एक ‘गोलमेज परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत कला, भाषा, शिक्षण, रोजगार, स्थानिक समस्या, इत्यादी मुद्दय़ांवर राजकीय अनुषंगाने चर्चा करताना सहभागी मतदारांनी सध्याच्या राजकारणाबाबत तरुणवर्गाची भूमिका स्पष्ट केली. २०१४ ची निवडणूक ज्या मुद्दय़ांवर लढवली गेली त्याच मुद्दय़ांवर यंदाची निवडणूक ही लढवली जात असल्याक डे मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यकारिणीतील सदस्य असलेल्या ऐश्वर्या धनावडे हिने लक्ष वेधले. ‘सध्या मुंबईत पुलांचा प्रश्न गंभीर आहे. एलफि न्स्टनच्या पुलावर चेंगराचेंगरी झाली, अंधेरीचा आणि जीटी रुग्णालयाजवळील पूल पडला. हे पूल पडू नयेत म्हणून काम करण्यापेक्षा ते पूल कोणाच्या अखत्यारीत येतात यावरच जास्त वाद झाला. पायाभूत सुविधांकडेच राजकारणी लक्ष देऊ शकणार नसतील तर ‘सबका साथ’ मिळेलही, पण ‘सबका विकास’ कसा होणार?’ असा प्रश्नही ऐश्वर्याने उपस्थित केला.

‘नेते आपलेच प्रतिबिंब असतात. प्रचारात जेव्हा नेत्यांची भाषा ढासळते तेव्हा लोकांनी कडाडून विरोध केला पाहिजे. पण असे होत नाही. लोक अशा गोष्टींना प्रोत्साहन देतात’ अशी खंत विधीचे शिक्षण घेत असलेल्या ऋषिकेश पाटील याने व्यक्त केली. ‘नेत्यांनी धार्मिक मुद्दय़ांवर राजकारण थांबवावे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘पूरग्रस्त भागांत मदत करताना ज्या वेगाने स्वतच्या नावाचे स्टिकर मदतीच्या पाकिटांवर लावण्यात आले त्या वेगाने एखादी योजना गरजूंपर्यंत पोहोचत नाही. सरकारकडे आपत्कालीन व्यवस्थाच नाही’,  हे नकारात्मक वास्तव रोहन मिस्त्री याने मांडले. रोहन हा ‘आयसीटी’ महाविद्यालयातील पीएचडीचा विद्यार्थी आहे.

प्रचारफे ऱ्यांमुळे रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होते. यांविषयी विचारच केला जात नाही. मत मागायला उमेदवार येतो, मात्र त्याच्या कामाविषयी प्रश्न विचारेपर्यंत तो निघून गेलेला असतो. बऱ्याचदा पैसे देऊन मतदारांना आपल्या बाजूने वळवले जाते. उमेदवारांच्या या बेजबाबदार प्रचारपद्धतीवर तरुणांनी नाराजी व्यक्त केली. ‘लोकप्रतिनिधींनी प्रचारादरम्यान पोकळ आश्वासने देण्याचे टाळावे आणि तळागाळात जाऊन सामान्य माणसांचे प्रश्न समजून घ्यावेत’, अशी अपेक्षा ‘ब्लॉगर’ असलेल्या आनंद लेले याने व्यक्त केली.

कला दिग्दर्शन क्षेत्रात काम करणाऱ्या समीर ताभणे याने कला क्षेत्राला असलेल्या अपेक्षा मांडल्या. ‘कलाकार एखादी कला सादर करतो तेव्हा त्यात राजकीय हेतू नसतो. त्यामुळे सरकारने कलाकारांना नियंत्रित करणे टाळावे. चांगल्या नाटकांचे विषय परीनिरीक्षण मंडळाच्या र्निबधांमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच नाटय़शास्त्राच्या अभ्यासक्रमात पाश्चिमात्य नाटकांविषयी शिकवले जाते. त्याचप्रमाणे आशिया खंडातील नाटकांविषयीही माहिती दिली जावी’, असे तो म्हणाला.