प्रशांत देशमुख, वर्धा

डॉक्टर म्हणजे दुसरा देवच, अशी समाजाची मान्यता. परंतु या डॉक्टरांना आता देवत्व सोडून नेता बनण्याची प्रबळ ऊर्मी झाल्याचे चित्र सर्वपक्षीय इच्छुक डॉक्टरांच्या विधानसभेच्या दावेदारीने दिसून आले आहे.

वैद्यकीय सेवा करीत असताना शेकडोंचा आशीर्वाद व पुरेशी तिजोरी डॉक्टरांच्या गाठी असतेच. याच आधारावर जनतेचा कौल मागण्याचा विचार राज्याला नवा नाही. आमदार झाल्यानंतर या डॉक्टरांनी राज्याची आराग्यसेवा मंत्रीपद भूषवून सांभळल्याची उदाहरणे आहेतच. डॉ. बळीराम हिरे, डॉ. दौलतराव अहेर, डॉ. विमल मुंदडा व अन्य काहींसह अलीकडच्या काळात डॉ. दीपक सावंत यांनी आरोग्य मंत्रीपद भूषवले. राजकीय पक्षांनाही असा समाजातील सेवाभावी परिचित चेहरा निवडणुकीसाठी योग्य वाटतो. विदर्भातील तर डॉ. रणजीत पाटील व डॉ. अनिल बोंडे तर मंत्रीच आहेत.

डॉक्टर मंत्र्यांकडे पाहून तर यावेळी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी डॉक्टरांची गर्दी उसळली नाही ना, असा प्रश्न संभाव्य डॉक्टर उमेदवारांकडे पाहून उपस्थित केला जातो. नागपुरात भाजपचे डॉ. मिलिंद माने आहेतच.  वर्धा जिल्हय़ात बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पावडे (वर्धा) व निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. शिरीष गोडे (देवळी) यांनी भाजपतर्फे  दावा केला आहे. यवतमाळ जिल्हय़ात डॉ. संदीप धुर्वे यांनी भाजपतर्फे  व डॉ. नीलेश परचाके यांनी काँग्रेसतर्फे  पांढरकवडा येथून उमेदवारी मागितली आहे. पुसद किंवा आर्णी येथून तिकीट मिळण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. आर.पी. फु फोटे यांनी व्यक्त केली. वणी येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. महेंद्र लोढा इच्छुक आहेत. काँग्रेसचे डॉ. पी.टी. राठोड यवतमाळातून इच्छुक आहेत. सेनेतर्फे  उमरखेडमधून डॉ. विश्वनाथ विणकरे यांचा दावा आहे. राळेगावातून डॉ. अरविंद कुडमेथे इच्छुक असून पक्ष मात्र ठरलेला नाही. अमरावती जिल्हय़ातून मंत्री डॉ. अनिल बोंडे (मोर्शी) व डॉ. सुनील देशमुख (अमरावती) परत लढणार. तसेच भाजपतर्फे  डॉ. नितीन धांडे (चांदूर) व डॉ. उभाळ (अचलपूर) रांगेत आहे. काँग्रेसतर्फे  डॉ. वसंत लुंगे हे त्यांचे गुरुवर्य डॉ. सुनील देशमुख यांच्याविरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहे. अकोल्यातही डॉक्टरांची गर्दी आहे. भाजपतर्फे  डॉ. योगेश साहू, डॉ. अशोक कोळंबे, काँग्रेसतर्फे  डॉ. झिशान हुसेन, डॉ. अभय पाटील, डॉ. शैलेश देशमुख व वंचित आघाडीतर्फे  डॉ. रहमतखान अकोल्यातून लढण्यास इच्छुक आहे. काँग्रेसतर्फे  डॉ. सुधीर ढोणे (बाळापूर) व डॉ. संजीवनी बिहाडे (आकोट) यांची नावे आहेतच. तसेच अकोला पूर्वमधून डॉ. अरुण भागवत व डॉ. पुरुषोत्तम दातकर हे काँग्रेसतर्फे  दावेदारी करीत असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेचे आमदार असणारे मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी अकोटमधून विधानसभा लढण्याची तयारी ठेवल्याची चर्चा होते. कारंजा येथून सेनेतर्फे  डॉ. सुभाष राठोड व डॉ. महेश चव्हाण व अकोटमधून डॉ. बिपीन हिंगणकर इच्छुक आहेत. बुलढाणा येथून सेनेतर्फे  डॉ. मधुसूदन सावळे यांनी तयारी केली आहे, तर नांदोरा येथून भाजपतर्फे  डॉ. नांदूरकर दावेदारी करतात.

चंद्रपूर जिल्हय़ातून काँग्रेसतर्फे  वरोरा येथे डॉ. आसावरी देवतळे दावा करतात. तसेच त्यांचे पती डॉ. विजय देवतळे यांचीही शक्यता व्यक्त होते. गडचिरोलीतून भाजपतर्फे  डॉ. देवराव होळी व काँग्रेसतर्फे  डॉ. नामदेव उसेंडी तयारीत आहे. बल्लारपूरमधून काँग्रेसतर्फे  डॉ. विश्वास झाडे प्रयत्नशील आहे. ही सध्या चर्चेत असलेली नावे असून पडद्यामागून प्रयत्न करणारी डॉक्टरमंडळी आहेतच.