शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही राज्यभरात सभा सुरू असून, त्यांची येवला-लासलगाव मतदारसंघात प्रचार सभा झाली. यावेळी ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली. “येवल्याच्या विकासासाठी ‘वचननामा’ करावा लागला. मग सत्तेसाठी आमदार काय करत होते? त्यामुळे आता वेळ आलेली आहे. इथला पाहुणा निवडून देऊ नका. हे पार्सल पाठवून द्या. कुठेही पाठवा पण मुंबईत पाठवू नका, असं टीकास्त्र ठाकरे यांनी सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने राज्यात सर्वत्र धुरळा उडत आहे. युती आणि आघाडीतील पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही प्रचारात झोकून दिल्याचं पाहायला मिळतं आहे. दरम्यान, येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची शनिवारी सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना झालेल्या अटकेवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर ती चूक छगन भुजबळांची होती, असे नाव घेवून सांगावे. विभागाचे प्रमुखांची ती चूक होती, असे ते सांगत असले तरी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणार्‍यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही,” असं सांगत ठाकरे म्हणाले, “बाळासाहेबांनी सूडाने कारवाई करणार्‍यांच्या पार्श्वभागावर लाथ घातली असती. शिवशाहीचे सरकार आल्यानंतर कोणाशीही सूडाने वागू नका, जनतेची कामे करा, सुख-समाधान द्या, न्याय्य-हक्कासाठी आंदोलन करणार्‍यांवर लाठय़ा चालवू नका, असे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना निक्षून सांगितले होते,” असं उद्धव ठाकरे यावेळी सांगितलं. “राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समस्या आहे. त्या सोडवण्यासाठी मला विधानसभेत महायुतीचे २८८ आमदार पाहिजेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते अजित पवार

‘बाळासाहेबांच्या अटकेविषयी आम्ही त्यावेळी संबंधित व्यक्तीला विचारलं की असे का करताय, तेव्हा ते म्हणाले, की आम्ही या विभागाचे प्रमुख आहोत. आम्हाला योग्य वाटतो तो निर्णय आम्ही घेणार आहोत. शिवसेनाप्रमुख बा‌ळासाहेब ठाकरे यांना अटक करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची चूकच होती. फक्त काही वरिष्ठांच्या हट्टापायी ही कारवाई करण्यात आली,” असं अजित पवार एका मुलाखतीत म्हणाले होते.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont send this parcel to mumbai uddhav criticized to bhujbal bmh
First published on: 14-10-2019 at 08:50 IST