अर्थव्यवस्थेबाबत डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : ‘आमच्या सरकारच्या चुकांमधून धडा घेऊन मोदी सरकारने आर्थिक पातळीवर ठोस उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र, गेली साडेपाच वर्षे सत्तेत असूनही मोदी सरकार आमच्यावर खापर फोडण्यात धन्यता मानत आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी केली.

काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत आलेल्या डॉ. सिंग यांनी मान्यवर नागरिकांशी संवाद साधताना आणि पत्रकार परिषदेत बोलताना भाजप सरकारला लक्ष्य केले. डॉ. सिंग आणि रघुराम राजन यांच्या कार्यकाळात सार्वजनिक बँकांची दुरावस्था झाल्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले.

‘मोदी सरकार गेली साडेपाच वर्षे सत्तेत आहे. ठोस निर्णय घेण्यासाठी हा कार्यकाळ पुरेसा होता. आर्थिक आघाडीवर   सुधारणा करण्याची संधी होती. कोणत्याही आजारावर योग्य निदान करणे आवश्यक असते. पण, हे सरकार आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर खापर फोडण्यातच धन्यता मानत आहे. मोदी सरकारने वेळीच योग्य उपाय उचलली असती तर बँकांवर ही वेळ आली नसती आणि नीरव मोदी किंवा अन्य बँकबुडवे देशाबाहेर पळून गेले नसते, असा टोला डॉ. सिंग यांनी लगावला.

मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी विकासदर १० ते १२ टक्के आवश्यक आहे. सध्या हा दर सहा टक्क्य़ांच्या आसपास आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालातही हा दर ६.१ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आधी हा दर ७.३ टक्के होता, याकडे डॉ. सिंग यांनी लक्ष वेधले.

मनमोहनसिंग उवाच..

* काँग्रेसचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना नव्हे तर त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला विरोध होता. त्यांच्यावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन इंदिरा गांधी यांच्याच कार्यकालात झाले होते.

* अनुच्छेद ३७० रद्द करण्यास काँग्रेसचा विरोध नव्हताच. मात्र  एवढा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक जनतेला विश्वासात घ्यायला पाहिजे,हीच आमची भूमिका आहे.

मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला

आर्थिक मंदीचा फटका मुंबई आणि महाराष्ट्राला बसेल, अशी भीतीही डॉ. सिंग यांनी व्यक्त केली. गेल्या चार वर्षांत निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राची मोठय़ा प्रमाणावर पीछेहाट झाली. महाराष्ट्रातच सर्वाधिक उद्योग बंद पडले. पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या शहरांतील औद्योगिक पट्टय़ातील चित्र आशादायी नाही. अनेक उद्योग बंद पडत आहेत. शहरी भागात प्रत्येक तिसरा तरुण सध्या बेरोजगार आहे. महाराष्ट्रात यापूर्वीच्या काळात सर्वाधिक गुंतवणूक होत असे. पण सध्या गुंतवणूकदार अन्य राज्यांमध्ये जात आहेत. दुर्दैवाने केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारे लोकाभिमूख निर्णय घेत नसल्याची टीकाही डॉ. सिंग यांनी केली.