विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २० दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्यास असमर्थ ठरल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचे प्रयत्न केले जात आहे. यासाठीच मागील दोन दिवसांपासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र या सर्व भेटींच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पेहरावामध्ये मोठा बदल झाल्याचे पहायला मिळत आहे.

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला आमंत्रण दिल्यानंतर २४ तासांमध्ये शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पाठिंबा पत्रे मिळाली नाही. त्यामुळेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले. मात्र राष्ट्रवादीला दिलेली २४ तासांची मुदत पूर्ण होण्याआधीच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दरम्यान रविवारी रात्रीपासूनच म्हणजेच सत्ता स्थापनेचे आमंत्रण मिळाल्यापासूनच उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. सत्ता स्थापनाचा दावा केला तरी बहुमतासाठीचा पाठिंबा शिवसेनेला राज्यपालांसमोर सादर करता आला आहे. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरु आहे. या चर्चा मुंबईमध्ये वेगवेगळ्या पंचारांकित हॉटेल्समध्ये होत आहेत. या बैठकींना उपस्थित राहणारे उद्धव ठाकरे हे नेहमीप्रमाणे पारंपारिक भारतीय पोषाखाऐवजी फॉर्मल शर्ट आणि पॅण्टमध्ये दिसत आहेत.

सामान्यपणे उद्धव हे सार्वजनिक जिवनामध्ये भागवा अथवा पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसतात. मात्र मागील काही दिवसांपासून ते फॉर्मल कपड्यांमध्ये दिसतात. हिंदुत्वावादी भूमिकेसाठी देशभरात ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या मंचावरुन बोलताना नेहमीच उद्धव हे पारंपारिक भारतीय पोषाखामध्ये दिसून येतात. मात्र मंगळवारी रिट्रीट हॉटेलमध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच बैठक असो किंवा आज (बुधवारी) ट्रायडण्ट हॉटेलमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांबरोबरची बैठक असो उद्धव हे फॉर्मल कपड्यांमध्येच दिसले. त्यामुळेच शिवसेनेने दोन्ही काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी आतापासूनच मवाळ भूमिका घेत विचारांबरोबर आचारातही बदल केल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करताना हिंदुत्व आड येणार नाही, असे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. किमान समान कार्यक्रमावर एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले. “हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत जी युती होती त्यात आता फाटाफूट झालेली आहे. आम्ही महाशिवआघाडी केली म्हणजे धर्मांतर केलेलं नाही. त्यामुळे या नव्या आघाडीतही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या नव्या सरकारसाठी किमान समान कार्यक्रमावर एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न असून जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार येणार असेल तर हिंदुत्व त्याच्या आड येणार नाही,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.