मतदान चिठ्ठीचे वाटप नियोजित वेळेत पूर्ण करावे, भरारी पथकांनी प्रभावीपणे कारवाई करावी 

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार चिठ्ठय़ांचे वाटप नियोजित वेळेत पूर्ण करावे, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भरारी पथकांनी प्रभावीपणे कारवाई करावी, १० लाखापेक्षा अधिक रोख रक्कम अथवा मौल्यवान वस्तू चौकशीत आढळल्यास प्राप्तीकर विभागाला माहिती द्यावी, अशा सूचना निवडणूक आयोगाच्या पथकाने केल्या आहेत.

विभागातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. पहिल्या सत्रात आयोगाच्या पथकाने विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा केली. या बैठकीस इतर कोणालाही प्रवेश नव्हता. दुसऱ्या सत्रात संयुक्त बैठक झाली. या वेळी राज्याचे विशेष खर्च निरीक्षक मुरलीकुमार, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त राजाराम माने आदी उपस्थित होते.

निवडणुकीसाठी नियोजनबद्ध तयारी करण्यावर भर द्यावा आणि पूर्वतयारीत आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे केले जावे, विधानसभा निवडणूक सुरळीतपणे आणि शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत. अपंग मतदारांना मतदानासाठी आवश्यक किमान सुविधा दिल्या जाव्यात, असेही कुमार यांनी सांगितले.  मतदार चिठ्ठीचे वेळेत वितरण झाल्यास मतदानाची टक्केवारी वाढू शकते. चिठ्ठीचे वितरण वेळेत होईल, असे नियोजन करावे, असे त्यांनी सूचित केले. सुरक्षा व्यवस्था, दुर्गम भागातील संवाद व्यवस्था, मतदान केंद्रातील व्यवस्था, वेब कास्टिंग, मतमोजणी केंद्र व्यवस्था, ईटीपीबीएस प्रणाली, स्वीप कार्यक्रम आदींचा आढावा घेण्यात आला. मुरलीकुमार यांनी स्थिर सर्वेक्षण पथक आणि भरारी पथकांनी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करावा, याकडे लक्ष वेधले. या पथकातील सदस्यांना तसे प्रशिक्षण द्यावे. लोकसभा निवडणुकीत भरारी पथकांनी प्रभावीपणे काम केले होते. ठिकठिकाणी छापे मारून संशयास्पद रोकड, अवैध मद्यसाठा आदी जप्त करण्याची कारवाई झाली होती. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदार संघांची संख्या अधिक आहे. मात्र कारवाईचे प्रमाण काही अंशी कमी दिसते. प्रत्येक मतदारसंघात भरारी पथकाने बारकाईने नजर ठेवावी, अशा सूचनाही केली.   यावेळी निवडणूक अधिकारी सूरज मांढरे, गंगाथरन देवराजन, अविनाश ढाकणे, राहुल द्विवेदी, डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, महेंद्र पंडित, विश्वास पांढरे, इशू सिंधू, उपायुक्त रघुनाथ गावडे आदी  उपस्थित होते.

हवाई आढावा

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक तीन दिवसीय दौऱ्यात राज्यातील निवडणूक तयारीचा विभागवार आढावा घेत आहे. सर्वत्र जलदपणे पोहोचता यावे म्हणून पथक हेलिकॉप्टरने प्रवास करीत आहे. पुण्यातील बैठक आटोपून शुक्रवारी ते नाशिकला आले. नाशिकची बैठक झाल्यानंतर ते हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे गेले. रात्री तिथेच मुक्काम करून शनिवारी पथक अमरावतीला हेलिकॉप्टरने जातील. त्या दिवशी दुपारी गडचिरोली येथील बैठक आटोपून सायंकाळी ते नागपूरला पोहोचतील. नागपूरची बैठक आटोपून हे अधिकारी विमानाने दिल्लीला रवाना होतील, असे दौरा कार्यक्रमात म्हटले आहे.