रस्ते दुरुस्तीसाठी आचारसंहितेपूर्वी घाईघाईत निविदा

कल्याण-कोन-भिवंडी मार्गावरील वाहतूक कोंडीस कारण ठरणाऱ्या दुर्गाडी पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीची अखेर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून निविदा मागविण्यात आली आहे. या भागात होत असलेल्या मोठय़ा कोंडीमुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपचे नेते विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य ठरले होते. या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची चाहूल लागताच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घाईघाईत निविदा मागविण्यात आल्या आहेत.

कल्याण-भिवंडी या परिसरात एकीकडे वाहतुकीच्या सुसज्जतेसाठी मेट्रोसारखे भविष्यातील प्रकल्प जोर धरू लागत असताना दुसरीकडे मूळच्या रस्ते वाहतुकीची अवस्था बिकट आहे. तिसरा नवा दुर्गाडी पूल, माणकोली आणि पत्री पुलासारखे प्रकल्प अद्याप रखडलेल्याच अवस्थेत आहेत. त्यामुळे भिवंडी, कल्याण, शिळफाटा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वर्षभरापासून मोठय़ा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान १९ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उल्हास नदीवरील नव्या दुर्गाडी पुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची निविदा मागवण्यात आली आहे. या कामासाठी २ कोटी ५३ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

कल्याण तसेच मुरबाड मार्गे अहमदनगर-पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि या भागातून ठाणे, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची दुर्गाडी पुलावरून वाहतूक सुरू असते. पुलाच्या दुर्दशेमुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. दरम्यान या पुलावरील रस्त्याची दुरुस्ती झाल्यास वाहनांचा वेग वाढून वाहतूक कोंडीपासून प्रवाशांना काहीसा दिलास मिळणार आहे.

तिसऱ्या नव्या खाडी पुलाचे काम रखडलेलेच

कल्याण-भिवंडी रस्त्यावर दुर्गाडी येथे उल्हास खाडीवर सुरू असलेल्या पुलाच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत. दुर्गाडी येथील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक झाला. त्यामुळे १५ वर्षांपूर्वी तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्या पुलाला पर्याय म्हणून नवीन दुसरा उड्डाणपूल बांधण्यात आला. तो पूलही आता वाढत्या वाहनांना अपुरा पडू लागल्याने दोन वर्षांपासून या पुलाच्या बाजूला एमएमआरडीएच्या माध्यमातून नवीन पूल उभारणीचे काम संथगतीने सुरू आहे. शिळफाटा भिवंडी रस्त्याने येणाऱ्या वाहनांची कोंडी फोडण्यासाठी या नव्या पुलाची उभारणी केली जात आहे.