News Flash

प्रचाराच्या नियोजनाची  आघाडी प्रतीककडे

केवळ उमेदवार आणि कार्यकर्तेच नव्हे तर निवडणुकीची धामधूम लक्षात घेऊन शिंदे यांचे कुटुंबीय प्रचारात सक्रिय आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

|| भक्ती बिसुरे

विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी शहरात सुरू झाली असून सर्वच उमेदवार पारंपरिक पद्धतीच्या वैयक्तिक भेटीगाठींबरोबरच स्मार्ट प्रचार करत दुहेरी प्रचाराला पसंती देताना दिसत आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी मिळाली असून त्यांच्याशी काँग्रेसचे पुणे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे अशी लढत होणार आहे. अरविंद शिंदे यांनी सर्व शक्तीनिशी प्रचाराला सुरुवात केली आहे. केवळ उमेदवार आणि कार्यकर्तेच नव्हे तर निवडणुकीची धामधूम लक्षात घेऊन शिंदे यांचे कुटुंबीय प्रचारात सक्रिय आहेत.

अरविंद शिंदे यांचा पुत्र प्रतीक वडिलांच्या प्रचारात सध्या पूर्ण वेळ देत आहे. हॉटेल मॅनेजमेंट या विषयात स्वित्र्झलडमधून उच्च शिक्षण घेतलेला प्रतीक पूर्ण वेळ हॉटेल व्यवसायात कार्यरत आहे. मात्र निवडणुकीचा काळ म्हणजे हॉटेल व्यवसायातून तात्पुरता ब्रेक घेऊन प्रचार एके प्रचार असाच दिनक्रम असल्याचं प्रतीक सांगतो. वडील अरविंद शिंदे आणि कुटुंबातले इतर सगळे सदस्य वैयक्तिक भेटीगाठींमधून प्रचाराला पसंती देत असताना प्रतीक मात्र आपल्या पिढीच्या मतदारांशी संवाद साधण्याला प्राधान्य देत आहे. त्यासाठी निवडणूक प्रचाराचं बॅक ऑफिस सांभाळणं, दुसऱ्या दिवशीच्या प्रचाराचं नियोजन करणं, कार्यकर्त्यांच्या बैठका अशी आघाडी प्रतीक सांभाळत आहे. युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी समाजमाध्यमांवरचा प्रचार वेगवान हवा ही त्याच्या पिढीची नस ओळखून त्या दिशेने तो कार्यरत आहे.

प्रतीक सांगतो, हॉटेल व्यवसाय ही खरे तर माझी वैयक्तिक आवड आहे. मात्र वडील निवडणूक लढवतात तेव्हा निवडणूक आणि प्रचार हेच मुख्य ध्येय म्हणून या कामात लक्ष घालतो. घरात नेहमीच राजकारण या विषयावर चर्चा आणि गप्पा होत असतात, त्यामुळे प्रचाराची धुरा वाहताना वेगळी तयारी करावी लागत नाही. कुटुंबातील आम्ही सगळेच जण काही ना काही जबाबदाऱ्या वाटून घेतो. आई महिला मतदारांच्या भेटीगाठी घेते. इतर भावंडे देखील पदयात्रा, बैठका, प्रत्यक्ष संवादातून मतदारांपर्यंत पोहोचतात. माझे वडील पहिल्यापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. परिसरातील नागरिकांशी त्यांनी मतदार म्हणून नव्हे तर कौटुंबिक संबंध जोडले आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचारही त्याच पद्धतीने पोहोचवणे मला महत्त्वाचे वाटते.

 

म्हणजे काय?‘एबी फॉर्म’ म्हणजे काय?

शहरासह जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध पक्षांकडून त्यांच्या अधिकृत उमेदवारांना ए आणि बी अर्ज (फॉर्म) दिले जातात. या अर्जाबद्दल ‘एबी फॉर्म’ असा उल्लेख निवडणुकीचे अर्ज भरेपर्यंत सातत्याने ऐकायला मिळतो. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकांचे उमेदवार निश्चित झाले की, राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करतात.

ए आणि बी असे दोन स्वतंत्र अर्ज असून निवडणूक आयोगाने १९६८ मध्ये दिलेल्या निवडणूक चिन्हांचे आरक्षण आणि वाटप या विषयी दिलेल्या आदेशान्वये या अर्जाचे ठराविक नमुने निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवारांना तंतोतंत त्याच नमुन्यात हे अर्ज भरून द्यावे लागतात. या अर्जामधील चुका किंवा त्रुटी यामुळेही उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे या अर्जाना महत्त्व आहे.

हे अर्ज मान्यताप्राप्त पक्षांतर्फे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनाच फक्त लागू असतात.

ए आणि बी अर्ज भरून देणारे उमेदवार त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार असतात. राजकीय पक्षांनी कोणत्या मतदारसंघातून कोणते उमेदवार उभे केले आहेत, त्याची माहिती निवडणूक आयोगाला अधिकृतपणे देण्याचे हे दोन अर्ज हे माध्यम आहे. प्रत्येक उमेदवारी अर्जाबरोबर हे दोन्ही अर्ज जोडावे लागतात. या अर्जामध्ये दिलेली माहिती अंतिम मानली जाते आणि त्याचआधारे मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे, पक्षाचे नाव व चिन्ह छापले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 1:28 am

Web Title: election vidhan sabha rally akp 94
Next Stories
1 जुन्या लढतीच नव्या स्वरुपात
2 पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघात २४६ उमेदवार रिंगणात
3 पुणे : पाण्यासाठी महिलांचा पालिकेच्या आवारात ‘हंडा’ गरबा
Just Now!
X