भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारासाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ आणि उमेदवारांची यावेळी उपस्थिती होती. मात्र या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याची टीका विरोधकांनी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे समर्थन करणाऱ्या काही फेसबुक पेजेसवरुन मोदींच्या सभेतील मागील रांगेतील शेकडो खुर्चा रिकाम्याच असल्याचे व्हिडिओ शेअर करण्यात आलेले आहेत.

महायुतीच्या पुण्यातील आठ उमेदवारांसह जिल्ह्य़ातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये मोदींनी अनुच्छेद ३७० रद्द करणे, जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्यांना शिक्षा करणे, सुरक्षा, स्वच्छता, रेल्वे, विमानमार्ग अशा अनेक विषयांवर भाष्य केले. मात्र या सभेसाठी मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा भाजपाला होती जी फोल ठरल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर मोदी पुण्याचा उल्लेख करुन बोलत असताना समोरील शेकडो खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कॅमेरा सर्व बाजुंना फिरवल्याचे दिसत असून अनेक खुर्चा रिकाम्या असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ मंडपाच्या मागील बाजूला काढण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. काही तांसामध्ये त्याला हजारोंच्या संख्येने शेअर्स मिळाले आहेत.

राष्ट्रवादी समर्थकांनी फेसबुकवरुन शेअर केला व्हिडिओ तुम्ही येथे क्लिक करुन पाहू शकता

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या मोदींच्या सभेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. १४ ऑक्टोबरपासूनच या सभेची तयारी सुरु होती. या सभेसाठी महाविद्यालयाच्या मैदानावरील २० ते २५ झाडे कापण्यात आली. त्यानंतर या सभेला काही तास शिल्लक राहिले असताना गुरुवारी मोदींच्या वाहनांचा ताफा स्टेजपर्यंत जाण्यासाठी आयोजकांनी चक्क मैदानातच ५० फुटी डांबरी रस्ता तयार केला होता. मात्र आता एवढे सगळं करुनही मोदींच्या सभेला भाजपाच्या अपेक्षेप्रमाणे गर्दी न झाल्याने ‘काय फायदा झाला मंडपासाठी झाडं तोडून’ असा सवाल राष्ट्रवादीचे समर्थक सोशल नेटवर्किंगवर विचारताना दिसत आहेत.