छत्रपती  शिवाजी महाराजांचे संपूर्ण घराणेच आता भाजपमध्ये आले आहे, यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आम्हालाच आहे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे सांगितले.

भाजपाची महाजनादेश यात्रा काष्टी येथे आली असता आयोजित सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, खा.डॉ. सुजय विखे पाटील, माजीमंत्री बबनराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, तुकाराम दरेकर,सदाशिव पाचपुते यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

ते म्हणाले,की काल अचानक दिल्लीला जावे लागले याचे कारण लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा देऊ न छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला. मागच्या काळात छत्रपती संभाजी राजे भाजपात आले. आता उदयनराजे भाजपात आल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण घराणे भाजपात आले .

महाजनादेश यात्रा कशासाठी, यावर  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,की ही यात्रा राज्यातील १२ कोटी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आहे. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस— राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीका केली.

ते म्हणाले,की राज्यातील काही भागात कमी पाऊ स असल्याने चारा छावणी, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यावर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. ज्या भागात जास्त पाऊ स पडतो त्या भागातील वाहून जाणारे पाणी वळवून ते गोदावरीच्या खोऱ्यातआणून ते दुष्काळग्रस्त भागासाठी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसाचे वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी मराठवाडा आणि नगर जिल्ह्यकडे वळविण्याचा आमचा मानस आहे.

या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची भाषणे झाली.

साकळाई योजना पूर्ण करू

ते पुढे म्हणाले,की नगर आणि श्रीगोंदे तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या साकळाई योजनेची सध्या पाहणी सुरू आहे. ती  पूर्ण होताच साकळाई योजनेसाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असेल. पुढील पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल.