राज्यात भाजपा आणि शिवसेनेने स्वतंत्ररित्या पुरेशा संख्याबळाअभावी सत्तास्थापन करण्यास राज्यपालांकडे असमर्थता दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी राज्यपाल सत्ता स्थापन करण्यापासून राजकीय पक्षांना रोखू शकणार नाहीत, असे मत काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा वेगळ्या असल्याने काँग्रेस निर्णय घेण्यास वेळ घेत आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, भिन्न विचारधारा वैगरे आधी होतं आता आमच्या भुमिकेमध्ये थोडा लवचिकपणा आला आहे. त्यामुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन होण्यास अडचण नसल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

दरम्यान, राज्यात कशा पद्धतीने सरकार स्थापन करायचं हे आम्ही राष्ट्रवादीच्या सल्ल्याने करणार आहोत. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सर्वजण सत्तास्थापेचा आकडा घेऊन राज्यपालांकडे गेले तरी सरकार स्थापन होऊ शकते, त्यांना राज्यपाल रोखू शकत नाहीत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकत्रितपणे चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच या पेचावर तोडगा निघू शकेल असेही सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.