X
X

Maharashtra exit poll results 2019 : महायुतीलाच कौल

READ IN APP

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये २०० हून जास्त जागांचे भाकीत

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये २०० हून जास्त जागांचे भाकीत

मुंबई : लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची विजयी घोडदौड कायम राहील. महायुतीला २०० हून जास्त जागा मिळतील, असे अंदाज बहुतेक सर्व खासगी वृत्तवाहिन्या आणि मतदानोत्तर चाचण्या करणाऱ्या संस्थांनी वर्तवले आहेत.

भाजप १४० जागांपर्यंत मजल मारून स्वबळावर सरकार स्थापण्यासाठी आवश्यक असलेल्या १४५ आकडय़ाच्या जवळपास पोचेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसे झाल्यास सत्तेच्या सारीपाटावर वेगळ्या चाली खेळल्या जातील.

‘इंडिया टुडे’ आणि ‘टीव्ही ९’ मराठी वगळता अन्य वृत्तवाहिन्यांनी महायुतीला २०० हून अधिक म्हणजे अगदी २४३ पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. तरीही अपेक्षेप्रमाणेच महायुती बाजी मारेल, असेच मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष आहेत. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीसह आघाडीला किती फटका बसला, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

गेल्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी कमी असल्याने आणि मुंबई-ठाण्यात मतदारांचा निरुत्साह दिसल्याने त्याचा सत्ताधारी महायुतीला लाभ होणार की फटका बसणार, याची चर्चा दिवसभर होती. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारांना मतदानासाठी आणण्याचे प्रयत्न दिवसभर केले. त्यामुळे काही प्रमाणात मते कमी मिळाली, तरी महायुतीचा विजय निश्चित आहे, असा दावा उभय पक्षांचे नेते करीत आहेत. मतदानोत्तर चाचण्यांनीही युतीच्याच बाजूने कौल दिला आहे. ‘सीएनएन-न्यूज १८’ने महायुतीला २४३ जागांवर विजय मिळेल, असे भाकीत वर्तविताना भाजपला १३० तर शिवसेनेला ११३ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

21
X