लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची विजयी घोडदौड कायम राहील. महायुतीला २०० हून जास्त जागा मिळतील, असे अंदाज बहुतेक सर्व खासगी वृत्तवाहिन्या आणि एग्झिट पोल (मतदानोत्तर चाचण्या) करणाऱ्या संस्थांनी वर्तवले आहेत. मात्र ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या वाचकांनी मात्र निकाल एग्झिट पोल प्रमाणे लागणार नाही असं मत नोंदवलं आहे. विशेष म्हणजे ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या या सर्वेक्षणामध्ये ८० हजारहून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले आहे. यापैकी ७५ टक्के वाचकांनी एग्झिट पोलनुसार निकाल लागणार नाही असं मत व्यक्त केलं आहे.

भाजप १४० जागांपर्यंत मजल मारून स्वबळावर सरकार स्थापण्यासाठी आवश्यक असलेल्या १४५ आकडय़ाच्या जवळपास पोचेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. ‘इंडिया टुडे’ आणि ‘टीव्ही ९’ मराठी वगळता अन्य वृत्तवाहिन्यांनी महायुतीला २०० हून अधिक म्हणजे अगदी २४३ पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. तरीही अपेक्षेप्रमाणेच महायुती बाजी मारेल, असेच मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष आहेत. असं असतानाच ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या वाचकांनी या एग्झिट पोलच्या विरोधी मत वर्तवले असून हे एक्झिट पोल सांगतात त्याप्रमाणे निकाल लागणार नाही असं मत वाचकांनी व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> Exit Poll: …या तीन निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचा अंदाज चुकला

‘लोकसत्ता ऑनलाइन’ने फेसबुकवर घेतलेल्या पोलमध्ये ७९ हजार ५०० हून अधिक जणांनी आपले मत नोंदवले. ‘एग्झिट पोल म्हणत आहेत पुन्हा एकदा ‘देवेंद्र सरकार’, निवडणूक निकालातही जनतेचा कौल हाच असेल असे वाटते का?,’ असा सवाल वाचकांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ७५ टक्के म्हणजेच जवळजवळ ५९ हजार वाचकांनी एक्झिट पोलचा अंदाज चुकीचा ठरु शकतं असं मत व्यक्त केले आहे. तर २५ टक्के म्हणजेच १९ हजार जणांनी एग्झिट पोल खरे ठरतील असं मत व्यक्त केले आहे.

ट्विटवरही ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने विचारलेल्या या प्रश्नाला एक हजार ४०० हून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले. ट्विटवरील ६० टक्के वाचकांनी एक्झिट पोलप्रमाणे निकाल लागणार नाहीत असं मत नोंदवलं आहे. तर ३१ टक्के वाचकांनी एग्झिट पोल खरे ठरतील असं मत व्यक्त केलं आहे. तसेच ९ टक्के वाचकांनी काय होईल हे ‘सांगता येत नाही’ असं म्हटलं आहे.

दरम्यान, ‘सीएनएन-न्यूज १८’ने महायुतीला २४३ जागांवर विजय मिळेल, असे भाकीत वर्तविताना भाजपला १३० तर शिवसेनेला ११३ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीसह आघाडीला किती फटका बसला, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.