नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात ‘पेड न्यूज’च्या संशयावरून राज्यातील विविध जिल्ह्य़ातील निवडणूक अधिकाऱ्यांनी एकूण १०० प्रकरणात नोटीस बजावल्या. यापैकी ३२ प्रकरणात तथ्य आढळून आले.

प्रचार काळात उमेदवाराने ‘पेडन्यूज’ द्वारे प्रचार केल्याचे आढळून आल्यास त्याची दखल घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी नोटीस बजावतात.  निवडणूक आयोगाच्या अहवालातील माहितीनुसार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील विविध जिल्ह्य़ातील  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘पेडन्यूज’च्या संशयावरून एकूण १०० प्रकरणात नोटीस बजावल्या. यात अमरावती जिल्हा १३, बुलढाणा ६, भंडारा १, गोंदिया ९, नागपूर २, वाशीम १,  कोल्हापूर ३, सोलापूर २३, सांगली ४, लातूर ८, नांदेड १, मुंबई १, उपनगरे १४, पालघर ९, रत्नागिरी १ आणि ठाणे जिल्ह्य़ातील ३ प्रकरणांचा समावेश होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्यावर संशयित पेडन्यूजची तपासणी झाली. यात ३२ प्रकरणात तथ्य आढळून आले. यात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्य़ातील सर्वच्या सर्व १३ प्रकरणे पेडन्यूजची आढळून आली. बुलढाणा जिल्ह्य़ातील सहापैकी दोन, कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्वच्या सर्व म्हणजे ३ पैकी ३, नागपूर जिल्ह्य़ातील दोन पैकी एक, पालघरमध्ये ९ पैकी ९ प्रकरणे पेडन्यूजची होती. रत्नागिरी १ आणि ठाणे जिल्ह्य़ातील तीन पैकी दोन प्रकरणे तपासाअंती पेडन्यूजची आढळून आली, असे आयोगाच्या अहवालात नमूद आहे. पेडन्यूजचा खर्च हा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जातो.