28 May 2020

News Flash

फडणवीस सरकारचे अपयश झाकण्यासाठीच भावनिक मुद्दे

गेली पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भाजपकडे होते आणि या कार्यकाळात दाखविण्यासारखी काहीही कामे झालेली नाहीत.

बाळासाहेब थोरात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी, मुंबई

बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कृषी, पिण्याचे पाणी, दुष्काळ असे राज्यापुढील विविध महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला गेल्या पाच वर्षांत पूर्णपणे अपयश आले. हे अपयश झाकण्यासाठीच भाजपने अनुच्छेद ३७० नुसार जम्मू आणि काश्मीरचा विशेषाधिकार रद्द करण्याच्या निर्णयाला प्राधान्य देत हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत भावनिक केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. राज्यात सत्ताबदल होईल, असा दावाही त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत थोरात यांनी, राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारवर जनता नाराज असल्याचे सांगितले.

* लोकसभा निवडणुकीतील  पराभवानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस पक्षात मरगळ आल्याचे जाणवते. अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्ष किती ताकदीने निवडणुकीला सामोरा जात आहे?

– लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बराच फरक असतो. विधानसभेची निवडणूक ही स्थानिक आणि राज्यांच्या प्रश्नांवर लढविली जाते. राष्ट्रीय आणि राज्यांचे प्रश्न वेगळे असतात. महाराष्ट्रासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. हे प्रश्न लोकांसमोर घेऊन आम्ही निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जात आहोत. राज्यभर फिरताना लोकांचा चांगला प्रतिसाद बघायला मिळतो. राज्यातील जनता भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे. या साऱ्यांचा नक्कीच काँग्रेस आघाडीला फायदा होईल. काही नेतेमंडळींनी पक्ष सोडला तो त्यांच्या स्वार्थासाठी. नेते गेले तरी कार्यकर्ते काँग्रेसबरोबरच आहेत.

* काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असली तरी काही ठिकाणी आघाडीत धुसफुस दिसते. काँग्रेस व राष्ट्रवादीचे बंडखोर काही मतदारसंघांमध्ये परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आघाडीत योग्य मेळ साधण्यात आलेला नाही का?

– काँग्रेस व राष्ट्रवादीत योग्य मेळ आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे राज्यभर दौरे करून आघाडीसाठी वातावरणनिर्मिती करीत आहेत. आघाडीत काही छोटे-मोठे वाद नेहमीच होतात. या वेळी हे प्रमाण फारच अत्यल्प आहे. भाजप आणि शिवसेनेचा पराभव करायचा हे एकच लक्ष्य काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आहे. महाआघाडीतील काही घटकपक्षांमध्ये विसंवाद झाला. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्या पक्षाला मतदारसंघ मिळावा ही अपेक्षा असते. यातून काही ठिकाणी उमेदवार परस्परांच्या विरोधात आहेत.

* २२० पेक्षा जास्त जागा जिंकणार आणि समोर फारच कमकुवत विरोधी पक्ष आहे, अशी विधाने मुख्यमंत्री व भाजपचे अन्य नेते करीत आहेत. याबद्दल तुमचे मत काय आहे?

– विरोधी पक्ष कमकुवत आहे, असा भाजपचा समज असला तर मग पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष शहा यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात का जावे लागत आहे. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतच्या साऱ्यांच्या भाषणांत सारा रोख हा काँग्रेसवर असतो. विरोधकांचे आव्हानच नाही असे मुख्यमंत्र्यांना वाटते, पण त्यांना प्रत्येक सभेत काँग्रेस आघाडीवर टीका का करावी लागते. भाजप किंवा शिवसेना नेत्यांच्या भाषणातील निम्मा वेळ हा काँग्रेसवर टीका करण्यात जातो. पुढील पाच वर्षांत काय करणार याचा पाढा वाचला जातो. पण गेल्या पाच वर्षांत काय केले याचा फार काही आढावा घेतला जात नाही. जाता जाता तेवढा साधा उल्लेख केला जातो. गेल्या पाच वर्षांत सिंचनाचे प्रमाण किती वाढले याची आकडेवारी सरकार सादर करू शकले नाही. उद्योग क्षेत्रात पिछेहाट झाली. बेरोजगारी वाढली. यावर काहीच उपाय सांगण्यात येत नाहीत.

* मोदी, शहा, फडणवीस सारेच नेते अनुच्छेद ३७० नुसार जम्मू आणि काश्मीरचा दर्जा रद्द करण्याच्या मुद्दय़ावर भर देत राष्ट्रीयत्वाचा मुद्दा सातत्याने पुढे आणीत आहेत. सामान्य लोक राष्ट्रीय मुद्दय़ांना भावतात हे अनुभवास येते. भाजपच्या या खेळीचा सामना कसा करणार?

– गेली पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भाजपकडे होते आणि या कार्यकाळात दाखविण्यासारखी काहीही कामे झालेली नाहीत. भाजप आणि शिवसेनेचे नेते साडेचार वर्षे सातत्याने परस्परांवर चिखलफेक करीत होते. यावरून लक्ष विचलित करण्याकरिताच कलम ३७०च्या मुद्दय़ाचा सातत्याने वापर केला जात आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सर्व सभांमध्ये फक्त हाच मुद्दा असतो. राष्ट्रीयत्वाच्या मुद्दय़ावर लोकांना भावनिक आवाहन करीत मते मिळविण्याची ही भाजपची खेळी आहे. भाजपचा हा खेळ यशस्वी होणार नाही. विधानसभेत शेवटी लोक स्थानिक प्रश्न, पाणी, पायाभूत सुविधा आदींचा विचार करून मतदान करतात.

 

* पाच वर्षांत प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजाविण्यात काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरला. अनेकदा चालून आलेली संधी घालवली. आता तरी पक्ष सुधारणार का?

– विरोधी पक्षनेत्यानेच सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आणि मंत्री झाले. सभागृहात भूमिका मांडण्याची सारी जबाबदारी ही विरोधी पक्षनेत्याची असते. विरोधी पक्षनेते बदलल्यावर काँग्रेस पक्ष आक्रमक दिसला.

* गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला  सर्वात कमी जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात काँग्रेसचा अस्त आणि भाजपचा उदय होत असल्याचे चित्र आहे याबाबत काय सांगाल?

– महाराष्ट्राने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आणि यापुढेही मिळत राहील.  राज्यात सत्ताबदल होईल. राज्यातील गोरगरीब जनतेचा अजूनही काँग्रेसवर विश्वास आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2019 4:38 am

Web Title: fadnavis government play with emotional issues to hide failure zws 70
Next Stories
1 सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच
2 निवडणुकीच्या रिंगणात सर्वपक्षीय ‘पाटीलां’चे शतक
3 शिवसेनेच्या स्वस्त वीज योजनेसाठी तिजोरीवर ४८०० कोटींचा भार
Just Now!
X