राज्यातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने कालचा दिवस अत्यंत महत्वाचा व निर्णयाक ठरला. काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, संख्याबळ नसल्याने देवेंद्र फडणवीस यांना देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीकडून एकमताने मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. आता उद्या (गुरुवार) उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांबरोबरच राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील ४०० शेतकऱ्याना तसेच, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

”राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील ४०० शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी आत्महत्या केलेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.” असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांचा उद्या शिवाजी पार्क मैदानावर शपथविधी होणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची ते शपथ घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज (बुधवार) सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांना आमदारकीची शपथ दिली.