विष्णू मनोहर, प्रसिद्ध शेफ

’निवडणुकीतील मुख्य मुद्दे कोणते?

बंद पडणारे उद्योग आणि रोजगाराची समस्या हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत. गेल्या पाच वर्षांत सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी ज्या योजना आणल्या, त्या योजनांची प्रशासकीय पातळीवर प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही. मुळात सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, त्यांना तो मिळतो की नाही याचा विचार सरकारने करण्याची गरज आहे.

आज काही लोकांची कामे राजकीय नेत्यांच्या वशिल्याने होतात. अशा वेळी सामान्य युवकांचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. स्किल इंडियाच्या माध्यमातून सरकारने अनेक उद्योगांसंबंधी योजना जाहीर केल्या. मात्र, त्यात किती तरुणांना कामे मिळाली याचा विचार करण्याची गरज आहे. उद्योग बंद पडत असून रोजगार मिळत नसल्यामुळे युवक भरकटत चालले आहेत. विदर्भात काटोलमध्ये संत्रा प्रक्रिया उद्योग अजूनही सुरू झाला नाही.

* या मुद्दय़ांना राजकीय पक्ष भिडतात असे वाटते का?

अजिबात नाही. राजकीय पक्षांचे नेते निवडून आल्यावर त्यांचा पाच वर्षांचा अजेंडा ठरलेला असतो. विशेषत: सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. तसे त्या राजकीय पक्षाकडून होताना दिसत नाही.

* तुम्ही उमेदवार असला तर प्राधान्य कशाला असेल?

रस्ते, पाणी, वीज आणि उद्योग या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करणार. शिवाय ग्रामीण भागात सर्व सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. आपल्याकडे सरकारी शाळा बंद होतात. मात्र अमेरिकेत तेथील सरकारी शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी तेथील पालक धडपडत असतात. स्मार्ट शहरापेक्षा स्मार्ट गाव बनवले गेले पाहिजे.

* नव मतदारांना काय संदेश द्याल?

नवीन मतदारांनी उमेदवारांचे चारित्र्य बघितले पाहिजे, काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे. त्यासाठी डोळे व कान उघडे ठेवले पाहिजे. शिवाय आमचे राजकारणाशी काही देणे घेणे नाही, अशी मानसिकता तर अजिबात ठेवू नये.

* प्रचारात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या, असे वाटते का?

राजकीय नेत्यांनी निवडणुकीदरम्यान प्रचार सभांमधून वैयक्तिक टीका टाळली पाहिजे. विकासाचे मुद्दे मांडले पाहिजेत. आजचा नागरिक सुजाण आहे. पूर्वी ज्येष्ठ नेत्यांकडे किंवा देशात सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीबाबत आदर होता. मात्र आज तो राहिलेला दिसत नाही.

      (संकलन – राम भाकरे)