राज्यात दुसऱ्यांदा आलेलं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार बहुमताअभावी चार दिवसांत पडलं. पण, फडणवीस यांचं सरकार पडावं म्हणून एका शेतकऱ्यानं चक्क तीन वर्षापूर्वींच तुळजापूरच्या आई तुळजाभवानीला नवस केला होता. हे सरकार पडल्यानंतरच अनवाणी पायानं चालत येऊन नवस फेडेल आणि मगच पायात चप्पल घालेल, असा नवस शेतकऱ्यानं केला होता.

अनिल पाटील असं या शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील शिरापूरचे रहिवासी आहेत. त्यांना सामाजिक काम करण्याची आवड असून, शेतीही करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सातत्यानं भूमिका घेऊन काम करतात. २०१५-१६मध्ये अनिल पाटील यांनी शिरापूर परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्वखर्चानं १० गावातील ११०० जनावरांसाठी चारा छावणी सुरू केलं होतं. यासंदर्भात पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री असताना भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद पाटील यांना मिळाला नाही. अनिल पाटील यांना फडणवीस यांच्या भेटीसाठी आत्मदहनाचाही इशारा दिला होता. त्याचीही दखल न घेतल्यानं नाराज झालेल्या पाटील यांनी तुळजापूरच्या आई तुळजाभवानीला नवस केला.

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये. ज्यादिवशी ते मुख्यमंत्रीपदावरून जातील तेव्हाच पायात चप्पल घालेल. तोपर्यंत अनवाणी पायानं फिरेल, असा नवस त्यांनी केला होता. तीन वर्षांपासून ते अनवाणी पायानं फिरत असून, राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर चक्क अनिल पाटील यांचा नवस पूर्ण झाला आहे. तीन वर्षांनी तुळजाभवानीनं माझ्या नवसाला कौल दिला असून, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून दूर व्हावं लागलं, असं मत अनिल पाटील यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर अनिल पाटील हे सोलापूर येथील रूपाभवानी येथून तुळजापूरला १६५ आमदारांच्या नावानं १६५ दंडवत घालत जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाचवाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. पण, न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर बहुमत नसल्याचं सांगत फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपाचं सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन होत आहे.