मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पहिल्याच सभेत पावसाचं विघ्न आलं. तसंच राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याने ते काय बोलणार? याची उत्सुकता सगळ्यांना आहेच. मात्र त्यांची खिल्ली उडवण्याचं काम सोशल मीडियावर सध्या सुरु आहे. ‘पुन्हा मिशन पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ या फेसबुक पेजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

काय म्हटले आहे पेजवरच्या पोस्टमध्ये?
राज ठाकरे यांचा गंभीर फोटो दाखवण्यात आला आहे. तर एक स्माईली खळखळून हसताना दाखवण्यात आली आहे. त्यानंतर, आमचे साहेब १० वाजता उठणार, १२ वाजता नाश्ता करणार, २ वाजता जेवणार! त्यानंतर परत थोडी वामकुक्षी, मग ५ ला सभेच्या ठिकाणी जायला निघणार, मग ८ वाजता सभा घेणार तोवर देवेंद्रजींच्या ३ सभा झालेल्या असतात. ऐसा कैसा चलेगा राजू, कौन देगा तुझे सत्ता का बदाम और काजू ! असा प्रश्न विचारुन देवेंद्र फडणवीस खळखळून हसताना दाखवण्यात आले आहेत.

भाजपाचे हे अधिकृत फेसबुक पेज नाही. मात्र भाजपा समर्थकांनी हे फेसबुक पेज सुरु केले आहे. यावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. काहींनी राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. तर काहींनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.