काँग्रेस-राष्ट्रवादी खिजगणतीतही नाहीत

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी टीम’ असल्याची टीका निर्थक असून काँग्रेस-राष्ट्रवादी  संपुष्टात आल्याने वंचितची लढाई खरेतर भाजप विरोधात आहे. आम्ही काँग्रेसबरोबर नाही, किंबहुना काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्या खिजगणतीतही नाहीत,अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीला  फटकारले. आगामी विधानसभेसाठी वंचित आघाडी भाजप विरोधात २८८ जागांसाठी लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, विरोधी पक्षाची जागा वंचित आघाडीला दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हे विधान काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सध्याची अवस्था पाहून एकप्रकारे खरे आहे. मात्र  ‘वंचित’ची झेप सत्ता संपादन करण्यापर्यंत आहे. पुढच्याच आठवडयात वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या काही उमेदवारांची यादी जाहीर होईल.

काँगेस, राष्टवादीला लागलेल्या गळतीबाबत ते म्हणाले, की सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्यास निवडून येण्याची कुणालाच खात्री नसल्यामुळेच लोक त्यांना सोडून जात आहेत.

या दोन्ही पक्षांचा जनाधार संपलेला आहे. त्यांनी आजवर वंचित घटकांच्या विरोधात गेली ७० वर्षे जे राजकारण केले त्याचाच हा परिपाक आहे.

लोक या दोन्ही पक्षांना कंटाळले आहेत. यामुळे या दोन्ही पक्षातील प्रस्थापित नेत्यांना आता काँग्रेस-राष्ट्रवादी हे गळय़ातील लोढणे वाटू लागले आहे. परंतु यामुळे यापुढे मतदारांची विभागणी थेट भाजप आणि वंचित आघाडी या दोघांमध्येच होणार आहे.

‘एमआयएम’साठी दारे खुली

राज्यात २८८ जागांसाठी आम्ही लढणार आहोत, याबाबत ‘एमआयएम’शी चर्चाही झाली. त्यांना १४४ जागा देण्याचा निर्णयही झाला. पण त्यांनीच संपर्क बंद केला. भाजपची ‘बी टिम’ म्हणून त्यांनी आरोप केला. असा आरोप करणारेच भाजपचे गुलाम आहेत, असे सांगून त्यांनी वंचित आघाडीची दारे आजही त्यांच्यासाठी खुली आहेत, हे स्पष्ट केले.