काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र न मिळाल्यामुळे महाराष्ट्रात अजून सत्ता स्थापनेचा पेच सुटू शकलेला नाही. काल संध्याकाळपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र मिळेल असे वाटले होते. पण तसे काही घडले नाही. काँग्रेसकडून अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच आहे.

दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी सत्ता स्थापनेसंबंधी महत्वपूर्ण विधान केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. आमची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चा सुरु आहे. आम्ही अंतिम निर्णय एकमताने घेऊ. राष्ट्रवादी बरोबर चर्चा झाल्यानंतरच पुढची भूमिका जाहीर करु असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.

शिवसेनेच्या समर्थनावरून आघाडीतच जुंपली

भाजपानं नकार दिल्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. परंतु २४ तासांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या समर्थनाचं पत्र त्यांना सादर करता आलं नाही. त्यातच आता झालेल्या उशीरावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे उशीर होत असल्याचं म्हटलं. तर अजित पवार यांनी काँग्रेसमुळे समर्थन देता आलं नसल्याचं म्हटलं.

आणखी वाचा- अनुभवी सरकारसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा : आशिष देशमुख

राज्यपालांनी शिवसेनेला दिलेल्या मुदतीत आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर करता आलं नाही. त्यामुळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केली आहे. परंतु पत्र देण्यावरूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.