राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची टीका

मुंबई : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला देशाचे अर्थशास्त्र समजलेले नाही, त्यांच्या चुकीच्या धोरणाचा देशावरच नव्हे तर सर्व राज्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे, केंद्राने राज्यांची आर्थिक नाकेबंदी केली आहे, अशी टीका काँग्रेस नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.

विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी गेहलोत बुधवारी मुंबईत आले होते. त्या निमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कारभाराचा समाचार घेतला.

मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत चुकीची आर्थिक धोरणे राबविली. जीएसटीची अंमलबजावणी संपूर्णत: चुकीच्या पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे अनेक व्यापार, लहान, मध्यम उद्योग-व्यवसाय नष्ट झाले. त्यामुळे महसुलात तूट आली. त्याचा दुसरा परिणाम म्हणजे केंद्राकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात कपात करण्यात आली. राज्याच्या काही योजनांना केंद्राकडून ९० टक्के निधी मिळायचा, तो हिस्सा कमी करण्यात आला. घटनाबाह्य़ शक्तीचा अंकुश

देशात भाजपचे सरकार असले तरी, त्यावर घटनाबाह्य़ शक्ती असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अंकुश आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर संघाचे प्रचारक आहेत, असे गेहलोत म्हणाले. आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे. भारताचे संविधान धोक्यात आलेले आहे. काँग्रेसने ७० वर्षे आपल्या देशातील लोकशाही टिकवून ठेवली.